हिमस्खलनात बेपत्ता सात जवानांना वीरमरण, लष्कराकडून दुजोरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । अरुणाचल प्रदेशातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथील डोंगराळ भागात हिमस्खलनात सात जवानांना वीरमरण आले आहे. लष्कराने मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच हे सैनिक बर्फाखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र बचाव पथकाला जवानांचे मृतदेह आढळून आले आहेत.

हिमस्खलनाची घटना राज्यातील कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात घडली. बेपत्ता जवान रविवारी लष्कराच्या गस्तीचा भाग होते. त्यानंतर त्यांना हिमस्खलनाचा तडाखा बसला. त्यांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक विमानाने घटनास्थळी पाठवण्यात आले, जेणेकरून त्यांची मदत बचाव कार्यात घेता येईल. मात्र, परिसरातील खराब हवामानामुळे काम कठीण झाले. या संपूर्ण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे.

जवानांसाठी कालपासून देशभरातून प्रार्थना केली जात होती. पण अखेर आज नको तीच बातमी समोर आली. भारतीय जवान कठीण काळात आणि किती ही संकटे आली तरी सीमेवर तैनात असतात. जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करतात. त्यांच्या या त्यागाला कधीच विसरता येणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *