महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालंय. यांत आता मनसेनंही उडी घेतलीय. शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका अशी भूमिका मनसेनं घेतलीय. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी आहे, त्यामुळे त्यावर अतिक्रमण नको असं मनसेनं म्हटलंय..
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, बाळासाहेब, लतादीदी क्रीडाप्रेमी होती. त्यांची देखील मैदानावरची भूमिका स्पष्ट असती त्यांनाही हे सगळं आवडलं नसते. छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. दादरच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर राम कदमांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून सध्या राज्यात राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्क ही फक्त मोकळी जागा नाही. ही जागा अनेक घटनांची मूक साक्षीदार आहे. इतिहासाशी आपल्याला जोडणारा दुवा आहे. लतादीदींचं स्मारक कुठे आणि कसं व्हावं यावर येत्या काळात वाद देखील होण्याची शक्यता आहे. पण लतादीदींनी गाण्यांच्या रुपानं कोट्यवधी माणसांच्या मनात निर्माण झालेलं स्मारक कायम अजरामर राहणार आहे.