Mobile Tariff Hike : टॅरीफमध्ये वाढ करण्याचे टेलिकॉम कंपन्यांचे संकेत ; मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । यंदाच्या वर्षात आता मोबाइल फोनवर बोलणं आणखी महागण्याची शक्यता आहे. फोन कॉल आणि इतर सेवांमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत एअरटेलच्या अधिकाऱ्याने दिले आहेत. सरासरी प्रति ग्राहक महसूल हा 200 रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर 2021 मध्ये एअरटेलने मोबाइल आणि सेवांच्या दरात 18 ते 25 टक्क्यांनी वाढ केली होती.

देशातील टेलिकॉम कंपन्यांची भूक भागणार नसल्याचे स्पष्ट संकेत टेलिकॉम कंपन्यांनी (telecom Company) दिले आहेत. ग्राहकांकडून अवाच्या सवा वसुलीसाठी कंपन्यांनी येत्या दोन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. एका ग्राहकाकडून कमीत कमी 300 रुपये वसुलीचे उद्दिष्ट टेलिकॉम कंपन्यांनी ठेवले आहे. सध्या या योजनेवर भारती एअरटेल कंपनी काम करत आहे. सध्या या कंपन्यांची मनमानी सुरुच आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रचंड दरवाढ केल्यानंतर नफा कमविण्याच्या लालसेत या कंपन्या देशातील करोडो युजर्सना पुन्हा महागाईचा शॉक देण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ करणा-या कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढीचे संकेत दिले आहे. सध्याचे दोन-चार महिने ही झळ बसणार नसली तरी याच वर्षात रिचार्ज करणे सर्वसामान्यांना अवघड होणार आहे. आता या दरवाढीचा फायदा कंपन्याना होतो की वापरकर्ते यातून आयडीयाची कल्पना लढवितात हे लवकरच स्पष्ट होईल. 2022 साली मोबाईल कॉल (Mobile Call) आणि सेवांच्या किंमतीही वाढण्याचे संकेत देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) दिले आहेत.

दरवाढीच्या या स्पर्धेत एअरटेल पुढे जाण्यास कचरणार नाही, असे कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-याने स्पष्ट केले. प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPQ) 200 रुपयांपर्यंत आणण्याचा कंपनीचा मानस आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एअरटेलने सर्वप्रथम मोबाइल आणि इतर सेवांच्या किमती 18 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियानेही आपापले कॉल दर आणि इतर सेवा महाग केल्या होत्या.

सध्या 4 महिने दिलासा
याच वर्षात टॅरिफ दर वाढण्याचे संकेत भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गोपाल विठ्ठल यांनी दिले. मात्र तुर्तास चार महिने हा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नेटवर्क सक्षमता आणि वेग वाढीवर भर देऊन वापरकर्त्यांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानंतर याच वर्षात दरवाढ करण्यात येणार आहे. प्रतिस्पर्धी तोपर्यंत काय भूमिका घेणार याकडे एअरटेलचे लक्ष असेल. मात्र त्यांनी काही हालचाल केली नाही तरी भारती एअरटेल दरवाढ करण्यात मागचापुढचा विचार करणार नसल्याचे विठ्ठल यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *