भारतरत्न लता मंगेशकर नावे कोणताही उपक्रम हाती घेऊ नका, मंगेशकर कुटुंबाची पत्रातून तीव्र नाराजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला आणि अवघं जग शोकाकुल झालं. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या लतादीदींची एक इच्छा मात्र अपुरी राहिल्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी सांगितलं. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन व्हावं, अशी लता दीदींची इच्छा होती. मुंबई विद्यापीठात (Mumbai University) त्यासाठी जागा निश्चितही झाली. मात्र जागा उपलब्ध न झाल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाचं स्वप्न दीदींच्या हयातीत पूर्ण झालं नाही, याबाबतची खंत मंगेशकर कुटुंबियांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. यापुढे विद्यापीठ प्रशासनाने कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लता दीदींच्या नावाने कोणताही उपक्रम हाती घेऊ नये, असंही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहित मंगेशकर कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्यात येत आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचं कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयावरुन मंगेशकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. तसेच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहित याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रात काय म्हटलंय?
मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन व्हावं, अशी लता दीदींची इच्छा होती. दीदींच्या इच्छेनुसार, राज्य सरकारने तेव्हा मंगेशकर कुटुंबातील सदस्य आणि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली.

दीदींच्या हयातीत स्वप्न पूर्ण झालं नाही
या समितीने शिफारस केली. त्यानुसार, मुंबई विद्यापीठात जागेची पाहणी करण्यात आली आणि ती निश्चित झाली. मात्र दुर्दैव असं की, लता दीदी हयात असताना समितीने निश्चित केलेली जागा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. जागा उपलब्ध न झाल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाचं स्वप्न हे दीदींच्या हयातीत पूर्ण झालं नाही. याबाबतची नाराजी मंगेशकर कुटुंबियांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आता दीदीही आता राहिल्या नाहीत. त्यामुळे आता त्या शासकीय संगीत महाविद्यालयाचं नाव हे दीदींच्या नावासह मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने म्हणजेच ‘भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ या नावाने स्थापन करण्यात यावं, अशी मागणी मंगशेकर कुटुंबियांची आहे. मंगेशकर कुटुंबियांनी याबाबतची मागणी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना केली आहे. त्यानुसार सरकार हा निर्णय जाहीर करेल, असं या पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात सांगायचा मुद्दा की, लता दीदींच्या नावासह मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचं नावही जोडून घेण्यात यावं, अशी मागणी कुटुंबियांची आहे. मात्र मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्यात येत आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचं कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे यापुढे विद्यापीठ प्रशासनाने कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लता दीदींच्या नावाने कोणताही उपक्रम हाती घेऊ नये, असंही या पत्रात नमूद केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *