महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । नवी दिल्लीसह काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे. मात्र, आता हा पाऊस आणखी सक्रीय होण्याची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं माहिती दिली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. काही ठिकाणी उन्हाचे चटके देखील जाणवू लागले आहेत. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात थंडी आहे. यातच आता पावसाचं पुन्हा आगमन होणार आहे. नागपुरात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. आता नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
एक दिवसापूर्वी हवामान विभागाने नवी दिल्लीसह हरियाणा, गुरुग्राम आणि उत्तर भारतातील काही भागात पावासाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये पावासानं जोरदार हजेरी लावली. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.