अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’साठी प्रदर्शनाचा मुहूर्त गवसला, 10 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय चित्रपट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० फेब्रुवारी । अक्षय कुमार स्टारर ‘पृथ्वीराज’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे. हा चित्रपट शेवटचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. या चित्रपटातील संजय दत्त आणि सोनू सूद यांच्या व्यक्तिरेखाही समोर आल्या आहेत. यामध्ये संजय काका कान्हाच्या भूमिकेत तर सोनू चंद वरदाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेलं रणांगण आणि दमदार डायलॉगने प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतले होते. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. खरं तर यापूर्वी हा चित्रपट 21 जानेवारी 2022 ला प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे याचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते.

पृथ्वीराज चौहान यांचा जन्म 1168 साली झाला होता. ते अजमेरचे राजा सोमेश्वर चौहान यांचे सुपूत्र होते. पृथ्वीराज चौहान यांनी वयाच्या 13 व्या वर्षी राजगडची गादी सांभाळली होती. महापराक्रमी योद्धा व कुशल धनुर्धर अशी त्यांची ख्याती होती. गझनीच्या शहाबुद्दीन मुहम्मद घोरीने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले होते. त्यापैकी सोळा वेळा पृथ्वीराज चौहान यांनी त्याचा पराभव केला होता.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ‘पृथ्वीराज’शिवाय तो लवकरच ‘बच्चन पांडे’, ‘राम सेतु’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *