RBI MPC Meeting: महागाईची झळ मार्च 2022 पर्यंत सहन करावी लागणार , शक्तिकांत दास यांचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । कोरोना साथीच्या फटक्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था (Indian Economy after coronavirus pandemic) आता हळूहळू रुळावर येत असली तरी अद्याप महागाईचा (Inflation) आलेख चढताच आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) व्याजदर कमी ठेवण्याचे धोरण अवलंबत आहे, मात्र महागाई कमी होण्याची चिन्हे अद्याप तरी दृष्टीक्षेपात नाहीत. चालू तिमाही अखेर म्हणजे मार्च 2022पर्यंत महागाईचा त्रास होण्याची शक्यता आहे, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी स्पष्ट केलं आहे. आज (10 फेब्रुवारी 22) रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या तीन दिवसीय आढावा बैठकीनंतर (RBI MPC) माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी शक्तीकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे किरकोळ महागाईची (Retail Inflation) आकडेवारी जाहीर केली. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच महागाईचा आलेख खाली येण्याची चिन्हे असून, चालू तिमाहीत म्हणजे जानेवारी-मार्च 2022 दरम्यान नागरिकांना किरकोळ महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे, असं त्यांनी नमूद केलं.

शक्तिकांत दास म्हणाले की, पुढील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 4.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. महागाईचा दर चालू तिमाहीत उच्च राहील, पण तो 6 टक्क्यांच्या निश्चित मर्यादेच्या पुढे जाणार नाही. मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं (Reuters News Agency) अर्थतज्ज्ञांच्या हवाल्यानं दिलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, जानेवारीमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांवर पोहोचेल, असं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं हा दर गाठण्याची शक्यता अगदी अवघड असल्याचं म्हटलं आहे.

शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, सध्या जगभर महागाई वाढत आहे. देशात महागाई वाढण्यासाठी देशांतर्गत घटकांपेक्षा जागतिक परिस्थिती अधिक कारणीभूत आहे. जागतिक परिस्थितीच्या दबावामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे सध्या फक्त आपल्या देशातील महागाई कमी होण्याची शक्यता कमी आहे. 2022-23 च्या उत्तरार्धानंतर म्हणजेच सप्टेंबर 2022 नंतरच महागाईत नरमाई येण्याची चिन्हे आहेत.

‘अन्न, भाजीपाला, इंधन, कपडे महाग आहेत असं लोकांना वाटत असेल तर त्यांच्या मनावर महागाई झाल्याच्या विचाराचा प्रभाव असेल. ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या आणि दूरसंचार कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत, त्याचा परिणामही किरकोळ महागाईवर नक्कीच दिसून येईल, ‘असंही वक्तव्य दास यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *