प्रवाशांचा संताप : पुण्यातील ‘या’ भागात रिक्षाचालकांनी अचानक पुकारला बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ फेब्रुवारी ।शहरात ‘रॅपीडो’ अ‍ॅपद्वारे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू केल्याने हडपसरमधील मगरपट्टा परिसरात रिक्षा संघटनेनं अचानक बंद पुकारला. तसंच सकाळपासून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या रिक्षा अडवून आतील प्रवासी खाली उतरवण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Pune Rikshawala)

आंदोलन सुरू करण्यात आल्याने मगरपट्टा चौकात रिक्षाचालकांची मोठी गर्दी झाली. रिक्षा बंदबाबत संघटनेने कोणत्याही सूचना दिला नसल्याने प्रवाशांनी पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे या दाखल झाल्या आणि तुम्ही अचानक बंद कसा पुकारू शकता? असा सवाल करत त्यांनी रिक्षाचालकांना फटकारले.

‘प्रवाशांना खाली उतरवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, बळजबरीने प्रवाशांना रिक्षातून बाहेर काढणं चुकीचं आहे, तुम्हाला जे काय बोलायचं ते आरटीओसोबत बोला, आम्हाला कसलंही निवेदन दिलं नाही,’ अशा शब्दांत वाहतूक पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी खडसावलं. तसंच हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पोमन यांनी मगरपट्टा चौकात आंदोलन करू नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला. प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रिक्षाचालक शांत झाल्याचं पाहायला मिळाले.

दरम्यान, सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच झालेल्या या सर्व प्रकारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप झाला असून रिक्षाचालकांच्या आडमुठ्या भूमिकेबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *