महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .11 फेब्रुवारी । गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर भारतात थंडी, धुके, पाऊस आणि हिमवृष्टीचा जोरदार मारा झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत याठिकाणी थंडीने दिलासा दिला आहे. पंजाब, चंदीगड, दिल्लीसह उत्तर प्रदेशात किमान तापमानाचा पारा वाढला असून गारठा कमी झाला आहे. असं असलं तर सध्या उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार थंडी (Cold weather in maharashtra) जाणवत आहे. धुळ्यात आज सर्वात कमी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची (Minimum temperature) नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात सध्या काही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही भागांत अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. बुधवारी रात्री भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर आज पूर्व विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे. लाखांदूर, साकोली, तुमसर आणि लाखनी ह्या भागात अवकाळी पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात घोंघावत आहेत.
दुसरीकडे आज पुण्यात देखील काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाजवळ पोहोचला होता. त्यामुळे रात्री आणि पहाटे थंडीसह मोठ्या प्रमाणात धुकं पडलं होतं. आज पुणे जिल्ह्यात पाषाण येथे सर्वात कमी 10.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर उर्वरित पुणे जिल्ह्यातील तापमान 11 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं गेलं आहे.
याव्यतिरिक्त सांतक्रूझ 11.9, कुलाबा 21, रत्नागिरी 19.5, डहाणू 17, बारामती 13, नागपूर 14.4, महाबळेश्वर 12.8, सातारा 16.7, उस्मानाबाद 12.1, जळगाव 12.4, परभणी 14.1, नाशिक 11.3 कोल्हापूर 18.9, नांदेड 16.2, सांगली 19.4, सोलापूर 17.1, मालेगाव 12.8, माथेरान 17, जालना 12.7 आणि चिखलठाणा येथे 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्यात अशीच स्थिती कायम राहणार असून त्यानंतर तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.