महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । महाशिवरात्री (Mahashivratri 2022) या दिवशी भगवान शंकरांसह (Lord Shankar) पार्वतीदेवीची आराधना केली जाते. महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि पार्वतीदेवीची विधीवत पूजा केली असता, भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, सुख-समृद्धी लाभते, असं मानलं जातं. भगवान शंकराची कृपादृष्टी लाभावी, यासाठी महाशिवरात्रीला विशिष्ट मुहूर्तावर विधीवत पूजा केली जाते. यंदा मंगळवारी, 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी पूजाविधीसाठी काही खास मुहूर्त सांगितले गेले आहेत.
महाशिवरात्री ही हिंदू धर्मातील सणांपैकी महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी भगवान शंकरांसह पार्वतीदेवीचे विधीवत पूजन केलं असता, सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धारणा आहे. सर्वसामान्यपणे भारतात (North India) वर्षातून दोन वेळा महाशिवरात्री पर्व साजरं होतं. यातील पहिलं पर्व फाल्गुन महिन्यात तर दुसरं पर्व श्रावण महिन्यात असतं. उत्तर भारत आणि दक्षिण भारतात वेगवेगळी पंचाग वापरली जातात.
त्यामुळे उत्तर भारतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री पर्व साजरं केलं जातं. आपल्याकडे दक्षिण भारतातील (South India) पंचागानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री पर्व साजरं होतं. यंदा मंगळवारी म्हणजेच 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे. 1 मार्चला पहाटे 3 वाजून 16 मिनिटांनी शिवरात्र सुरू होईल. हा कालावधी 2 मार्चला सकाळी 10 वाजेपर्यंत असेल. रात्रीच्या पूजेचा कालावधी सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी सुरु होईल आणि तो मध्यरात्री 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. शिवरात्रीच्या दिवशी प्रामुख्याने चार प्रहरांमध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना पंचामृतानं अभिषेक करावा. केसरयुक्त आठ भांडी पाणी अर्पण करावं. देवघरातील दिवा रात्रभर तेवत ठेवावा. कपाळावर चंदनयुक्त गंध लावावे. त्यानंतर बेलाची तीन पानं, तुळस, जायफळ, कमळ, फळे, मिठाई, गोड पान, सुपारी आणि दक्षिणा अर्पण करावी. भगवान शंकरांसह पार्वतीदेवीला केशरयुक्त खिरीचा (Saffron Kheer) नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटप करावा. पूजा करतेवेळी विविध गोष्टी अर्पण करताना ‘ॐ नमो भगवते रुद्राय, ॐ नमः शिवाय रुद्राय शंभवाय भवानीपतये नमो नमः’ या मंत्राचा जप करावा.
महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरांमध्ये भगवान शंकरांचं पूजन केलं जातं. त्यात पहिल्या प्रहरातील पुजेचा कालावधी – 1 मार्चला सायंकाळी 6:22 मिनिटांपासून ते रात्री 9:27 मिनिटांपर्यंत आहे. दुसऱ्या प्रहरातील पुजेचा कालावधी 1 मार्चला रात्री 9:27 मिनिटांपासून ते 12:33 मिनिटांपर्यंत आहे. तिसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ 1 मार्चला मध्यरात्री 12:33 मिनिटांपासून ते पहाटे 3:39 मिनिटांपर्यंत आहे. चौथ्या प्रहारातील पुजेचा कालावधी 2 मार्चला पहाटे 3:39 मिनिटांपासून ते सकाळी 6: 45 मिनिटांपर्यंत आहे. व्रताचं पारणं करण्यासाठी 2 मार्चला 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत शुभकाळ असेल.