मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास करता येणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना एकाच कार्डवर बेस्ट (BEST), रेल्वे आणि मेट्रोचा (Mumbai Metro) प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाकडून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवेमध्ये सामायिक कार्डची सुविधा आहे. तिथंही बेस्टच्या या कार्डचा वापर करता येणार आहे.

दररोज अनेकजण मुंबईत कामासाठी येत असतात. अनेकदा प्रवासासाठी काढाव्या लागणाऱ्या तिकीटासाठी बराच वेळ वाया जातो. अशातच बेस्ट उपक्रमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच, तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा देण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाने 2020 च्या ऑक्टोबरपासून ‘सामायिक कार्ड’च्या चाचणीला सुरुवात केली होती. त्यालाच अंतिम रुप देताना हे कार्ड प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बेस्टच्या कार्डचे फायदे :

रोख रकमेशिवाय प्रवास करणं शक्य
डेबिट कार्डप्रमाणेही वापर करता येणार
वीजबिलासह अन्य देयके भरण्याचीही सविधा

कार्ड वापरताना प्रवाशांना तिकिटाचे पैसे कार्डद्वारे भरावे लागणार आहेत. त्यासाठी कार्डमध्ये पैसे असणं गरजेचं असणार आहे. प्रवाशी हे कार्ड रिचार्ज करु शकणार आहे. याशिवाय बेस्टच्या या कार्डाचा वापर देशभरातील बस, मेट्रो आणि इतर परिवहन सेवांमध्ये जिथे-जिथे ‘सामायिक कार्ड’ची सुविधा देण्यात आली आहे. तिथे-तिथे बेस्टच्या कार्डाचा वापर करणं शक्य होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

कार्डसाठी एका बँकेशी करार करण्यात येणार असून प्रवासी वाहतुकीत तिकीट काढण्याबरोबरच डेबिट कार्डप्रमाणे या कार्डचा वापर करु शकणार आहेत. तसेच या कार्डद्वारे वीजबिल भरणं, यासह इतर देयकं भरण्याचीही सुविधा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *