महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आता हिंदुहृदयसम्राट म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. राज यांच्या स्वागतासाठी मुंबईतील घाटकोपर आणि चेंबूर परिसरात पदाधिकाऱ्यांनी भलेमोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला आहे. या बॅनरची जोरदार चर्चा मुंबईत होत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधतात. आता मनसेनेही हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताचे भलेमोठे बॅनर मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट असल्याचा उल्लेख केलेले बॅनर झळकल्याने त्याची जोरदार चर्चा मुंबईत सुरू आहे.