महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केले आहे. आज ते मुंबईत बोलत होते. 2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी ते म्हणाले, मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
समन्वयक यांनी मला सांगितल टोकाची भूमिका घेऊ नका असे सांगितले होते. परंतु सरकार या संदर्भात काहीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी नेहमीच शाहू महाराजांचा वारसा जपला आहे. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. आम्हाला टिकणारे आरक्षण हवे आहे, तशी आम्ही वेळोवेळी मागणीही केली आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांना आरक्षण कशामुळे गेलं हेही सांगितले आहे. आरक्षण देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. मात्र यावर काहीही तोडगा निघालेला नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल होतं. परंतू खुप दिवसांनंतर याचिका दाखल केली आहे. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजेंनी सांगितलं आहे.