महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । झी मराठीवरील आगामी ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या मालिकेत स्वप्नील सौरभची तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारणार आहे. मालिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, ‘मेघ दाटले’ या मालिकेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर ‘तू तेव्हा तशी’मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे. मधल्या काळात मी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कॅमिओ केले, पण पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय. स्वप्नील आणि मी याआधी एकत्र काम केलं आहे, पण या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षक आम्हाला प्रमुख जोडी म्हणून पाहू शकतील. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररीत्या मांडलं आहे, जे प्रेक्षकांनादेखील आवडेल याची मला खात्री आहे.’