IPL Auction 2022 डिव्हीलिअर्सची झलक, 18 वर्षांचा ‘Baby AB’ कोण आहे?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । इंडियन प्रीमिअर लीगच्या 15 व्या मोसमासाठी (IPL Auction 2022) बंगळुरूमध्ये दोन दिवस लिलाव प्रक्रिया चालली. या लिलावादरम्यान अंडर-19 वर्ल्डकप गाजवलेल्या अनेक खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली. यात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याचेही नाव आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांची बेसप्राईज असलेल्या डेवाल्ड ब्रेविस याला तब्बल 3 कोटी रुपयांची रक्कम देऊन आपल्या गोटात समाविष्ट केले.

क्रिकेटच्या जगतामध्ये 18 वर्षीय डेवाल्ड ब्रेविस हा ‘बेबी एबी’ (Baby AB) या नावाने ओळखला जातो. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये डेवाल्ड ब्रेविस याने खोऱ्याने धावा काढल्या. 6 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने तब्बल 506 धावा चोपल्या. 84.33 च्या दमदार सरासरीने त्याने या धावा केल्या. यंदाच्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्डही त्याच्या नावावर जमा झाला.

जोहान्सबर्गमध्ये जन्मलेल्या ‘बेबी एबी’ (Baby AB) याने वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानविरुद्ध पहिल्याच लढतीत आपल्या बॅटची ताकद दाखवून दिले. हिंदुस्थानविरुद्ध त्याने 65 धावांची खेळी केली. त्यानंतर युगांडाविरुद्ध 104, आयर्लंडविरुद्ध 96 आणि इंग्लंडविरुद्ध 97 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध मात्र तो 6 धावांवर बाद झाला, मात्र त्यानंतर बांगलादेशविरुद्ध पुन्हा त्याने तीन आकडी संख्या गाठत 138 धावा चोपल्या. तसेच गोलंदाजीतही त्याने हात आजमावला असून 7 बळीही घेतले आहेत.

दमदार फलंदाजी आणि कामचलावू गोलंदाजीमुळे ‘बेबी एबी’ (Baby AB) याने सर्वांचे लक्ष वेधले होते. दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज आणि ‘मिस्टर 360’ अशी ओळख असणाऱ्या एबी डिव्हीलिअर्सची त्याची तुलना केली जाते. याचमुळे आयपीएल लिलावामध्ये त्याच्यावर सर्वच संघांची नजर होती. 20 लाख रुपयांची बेसप्राईज असलेल्या डेवाल्ड ब्रेविस याला तब्बल 25 पट अधिक रक्कम मिळाली. मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात घेतले आहे. आता पाचवेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) मुंबई इंडियन्सला विजेतेपद पटकावून देणाऱ्या आणि सध्या टीम इंडियाचे टी-20 व वन डे संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तो सज्ज आहे.

सचिनचा चाहता

मुंबई इंडियन्सने कोट्यवधी रुपये मोजून आपल्या संघात घेतल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्ससारख्या जबरदस्त रेकॉर्ड असणाऱ्या फ्रेंचाईजीचा भाग बनणे सन्मानजनक आहे. मी आणि माझा भाऊ मुंबई इंडियन्सच्या अनेक खेळाडूंचा गेम पाहात मोठे झाले. मुंबई इंडियन्स ही एक अशी टीम इंडिया ज्याचा तुम्हाला कायमच अभिमान वाटतो. आयपीएलमधील त्यांचा रेकॉर्डच बोलका आहे, असे डेवाल्ड ब्रेविस म्हणाला. तसेच सचिन तेंडुलकर माझा लहानपणीपासूनचा हिरो असून रोहित सारख्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे तो म्हणाला.

 

डिव्हीलिअर्सची झलक

डेवाल्ड ब्रेविस याच्या फलंदाजीमध्ये एबी डिव्हीलिअर्सची झलक दिसते. त्याने अंडर-19 वर्ल्डकपमध्ये 18 षटकार आणि 45 चौकारांची आतषबाजी केली. डिव्हीलिअर्सप्रमाणे स्कूप, रिव्हर्स स्विप, पॅडल स्विप, अपरकट आणि स्विच हिटसाखरे फटकेही त्याने मारले. डिव्हीलिअर्सशी तुलना होऊ लागल्यानंतर ‘बेबी एबी’ म्हणाला की, एबी माझा लहानपणापासून आदर्श आहे. परंतु मी जाणूनबुजून त्याची नकल केली नाही. माझी ही शैली आपोआप विकसीत होत गेली आहे. टीव्हीवर मी त्याला खेळताना पाहिले आहे आणि तसेच फटके मी मारू लागलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *