महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । :शिवसेना खासदार संजय राऊत हे मंगळवारी दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहेत. संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाच्या परिसरात जय्यत तयारी सुरु आहे. शिवसेना भवनाच्या परिसरात ‘झुकेंगे नही’चे बॅनर्स झळकले आहेत. ही पत्रकारपरिषद लाईव्ह पाहता यावी यासाठी शिवसेना भवनाच्या बाहेरही एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्याआहेत. तर दुसरीकडे शिवसेना भवनामधील सभागृहात पत्रकारपरिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी शिवसेना भवनाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. संजय राऊत हे सध्या ‘सामना’च्या कार्यालयात आहेत. येथूनच संजय राऊत शिवसेना भवनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.
मुंबईच्या शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकारपरिषद होणार आहे. या पत्रकारपरिषदेच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला जात असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. या शिवसैनिकांमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. राज्याच्या इतर भागांमधूनही शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे आज शिवसेना भवनात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.