महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ फेब्रुवारी । कोरोना (covid 19) रूग्णांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. कोरोना काळात कंपन्याची आर्थिक स्थिती खालावली होती. मात्र, कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आणि दैनंदिन व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत झाल्यामुळे आता कंपन्यानी परत एकदा वेग पकडला आहे. नुकतेच एक सर्वेक्षण (Survey) झाले आहे. त्यानुसार नोकरदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सर्वेक्षणानुसार यंदा भारतीयांच्या पगारामध्ये (Salary) मोठी वाढ होणार आहे. या वर्षी देशातील पगारवाढ 9.9 टक्क्यांच्या पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचेल.
एऑन या भारतातील अग्रगण्य जागतिक व्यावसायिक सेवा कंपनीच्या 26 व्या वेतनवाढीच्या सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये मजुरी वाढ 9.9 टक्के असेल असा विश्वास विविध क्षेत्रातील संस्थांनी व्यक्त केला आहे. सर्वेक्षणात 40 हून अधिक उद्योगांमधील 1,500 कंपन्यांच्या डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, सर्वाधिक अंदाजे पगारवाढ असलेल्या उद्योगांमध्ये ई-कॉमर्स, हाय-टेक/माहिती तंत्रज्ञान आणि आयटीचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये सरासरी पगारात 9.9% वाढ मिळू शकते, जी 5 वर्षातील उच्चांकी आहे.
सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये ई-कॉमर्स क्षेत्र 12.4 टक्के वाढण्याचा अंदाज आहे, तर हाय-टेक क्षेत्र 11.6 टक्के, त्यानंतर व्यावसायिक सेवा 10.9 टक्के आणि IT 10.7 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. याउलट, धातू आणि खाणकाम (8.3 टक्के), रेस्टॉरंट्स (8.5 टक्के) आणि सिमेंट (8.6 टक्के) या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी वेतनवाढ दिसू शकते. जर आपण संपूर्ण क्षेत्राकडे बघितले तर यावर्षी कंपन्या पगारात 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्यास तयार आहेत. 32.3 टक्के कंपन्या यावर्षी 10 टक्क्यांहून अधिक पगार वाढवू शकतात, एक वर्षापूर्वी हा आकडा 27.5 टक्के होता.