शेंगदाण्याला रंग देऊन पिस्ता म्हणून विकला, शेकडो किलो माल जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ फेब्रुवारी ।नागपूर । शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन मिठाईत त्याचा पिस्ता म्हणून वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करीत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शांतीनगर येथून ६२१ किलो माल जप्त केला. हंसापुरी येथेही निकृष्ट दर्जाच्या फुटाण्यांना पिवळा रंग देऊन विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

शेंगदाण्याला रंग देऊन त्याचा मिठाईत पिस्ता म्हणून वापर केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. या आधारे सापळा रचून पथकाने शांतीनगर परिसरातील कावरापेठ येथे छापा टाकला. काशी शेंगदाणा चिप्स या नावाने असलेल्या दुकानातून शेंगदाण्याला रंग दिलेला माल जप्त करण्यात आला. हंसापुरी येथील आयुष फूड येथेही शेंगदाण्याची पिवळा रंग देऊन विक्री केली जात होती. एफडीएने ४५० किलो निकृष्ट प्रतीचा माल जप्त केला. एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे, साहाय्यक आयुक्त अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी विनोद धवड, पीयूष मानवटकर आदींनी ही कारवाई केली.

कारखान्याला टाळे

या दोन्ही कारखान्यांना टाळे ठोकण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले. अन्नसुरक्षा कायद्यानुसार कोणत्या खाद्यपदार्थाला आणि कोणता रंग द्यायचा याचे नियम आहेत. खाद्यपदार्थात रंग वापरणे हा गुन्हा असून, अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६नुसार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. एक लाखाचा दंड आणि कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले असून न्यायालयीन खटल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.

मिठाई खरेदी करताना काळजी घ्या

हॉटेलांमध्ये बनविण्यात येणाऱ्या काही पदार्थांमध्ये सिंथेटिक रंग वापरण्यास पूर्ण बंदी आहे. यात श्रीखंड, पनीर टिक्का, तंदुरी चिकन यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. चायनीज, मोमोज, बिर्याणी, पालकपनीर यातही सिंथेटिक रंग टाकण्यास बंदी आहे. मात्र, रंग टाकून ग्राहकांना आकर्षित केले जाते. खाद्यपदार्थांना अधिक भडक रंग दिसत असेल तर त्यापासून सावध राहण्याचा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. सुरक्षित खाद्य मिळावे, हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे. कायद्याचे पालन व्हावे, यासाठी ग्राहकांनीही अधिक शिक्षित होण्याची गरज आहे. खाद्यपदार्थांबाबत काही संशय आल्यास १८००२२२३६५, ०७१२-२५५५१२० येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *