महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ फेब्रुवारी । किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर ईडीची चौकशी लागली. त्या चौकशीला घाबरून नारायण राणे भाजपाला सरेंडर झाले, लाचारी पत्करली, शरणागती पत्करली. पण म्हणून ईडीपासून त्यांचा बचाव झालेला नाही. आम्ही सर्व शिवसेनेचे खासदार ईडीच्या कार्यालयास भेट देऊन, किरीट सोमय्या यांनी जे आरोप केलेले आहेत; त्या आरोपांची सखोल चौकशी झाली का? झाली नसेल तर केव्हा होणार, याबाबतची विचारणा ईडीच्या संचालकांकडे येत्या दोन दिवसांत करणार आहोत. नारायण राणे यांच्या सर्व फायली ईडीला देणार आहोत, अशी माहिती शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी आज दिली.
भाजपने केलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून वातावरण तापले आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी किरीट सोमय्यांचा जुना व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये सोमय्यांनी नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्यांनी ज्या तक्रारी केल्या त्याचे काय झाले, असा सवाल विनायक राऊत यांनी केला.
ते पुन्हा ईडी कार्यालयात जातील ही आशा
सोमय्या इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. तेव्हा ते राणे यांच्या विरोधातील आरोप आणि पुरावे घेऊन पुन्हा एकदा ईडी कार्यालयात जातील अशी आशा आम्हाला आहे, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला.
पत्रकार परिषदेतील ते व्हिडीओ
# काँग्रेसच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले, ‘खोटं बोला पण रेटून बोला’ याचे उत्तम उदाहरण कोण असेल तर त्यांचे नाव आहे ‘नरेंद्र मोदी’.
# भाजपवासी आमदार नितेश राणे यांनी खासदार किरीट सोमय्या आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे मराठी द्वेष्टे असल्याचा आरोप केला होता.
# हाफचड्डीवाले मराठा समाजाचेआरक्षण देऊ शकत नाहीत असेही नितेश राणे म्हणाले होते.
# राजन तेली भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा मुलगा प्रथमेश राणे याच्यावर सिंधुदुर्गला जाणाऱया ट्रेनमध्ये हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना या हल्ल्यामागे नितेश राणे असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला होता.
किरीट सोमय्यांचे नारायण राणे यांच्यावरील आरोप
# नारायण राणे यांच्या पत्नीच्या नावे असलेले कणकवली येथील नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यात मनिलाँडरिंगच्या माध्यमातून गुंतवणूक झाल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.
# मायनिंगमध्ये नारायण राणेंचा हात असल्याचे सांगून त्यावरून गंभीर आरोप केले होते
# नारायण राणे यांनी 100 बोगस कंपन्या निर्माण केल्या असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
# नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.