महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ फेब्रुवारी । नाशिक-पुणे प्रस्तावित ३३५.१५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही आपल्या वाट्याकडील २० पैकी १९.६ टक्के निधीला मान्यता दिली आहे. राज्य शासनाने आपल्या हिश्श्याच्या ३२ कोटींच्या निधीला आधीच मान्यता दिलेली असून समभागातून ६० टक्के निधी उपलब्ध आहे. त्यामुळे आता नीती आयोग आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम चार महिन्यांत सुरू होऊ शकणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे नाशिक, अहमदनगर आणि पुणे हे तीन जिल्हे एकमेकांना जोडले जातील आणि नाशिक-पुणे प्रवासाचे अंतरही अवघ्या दाेन तासांवर येणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु, राज्य व समभागातील निधी मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपासून केंद्राच्या २० टक्के हिश्श्याचा निधी प्रलंबित होता
१६,०३९ कोटींचा प्रकल्प : दोन विकसनशील शहरांना जोडणारा हा देशातील कमी खर्चिक, पहिला ब्राॅडगेज रेल्वे मार्ग व सेमी हायस्पीड काॅरिडाेर असेल. भूसंपादनासाठी २ हजार ९८१ कोटी तर बांधकाम व व्याजापाेटी ७१६ कोटी रुपये अपेक्षित आहे. रेल्वे मंत्रालय २० टक्के म्हणजे ३ हजार २०८ कोटी तर राज्य शासन ३ हजार २०८ कोटी रुपये आणि वित्तीय संस्थांकडून ९ हजार ६२३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. पुणे, नाशिक या शहरांवर नोकरी, राेजगाराकरिता भारही वाढतो आहे.
मात्र हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर शहरांवरील स्थलांतरित लाेकसंख्येचा भार कमी होणार असून आपल्या गावातूनच लाेक नाेकरी, राेजगारासाठी जाणे-येणे पसंत करू शकतील. दाेन्ही शहरात व लगतच्या परिसरात वाहन उद्योग मोठ्या प्रमाणावर असून त्यातील अंतर कमी हाेईल व नाशिकच्या उद्याेगांना माेठा फायदा हाेईल व स्थानिक व्हेंडर्सला पुण्याच्या उद्याेगांशी व्यवहार सुलभ हाेऊ शकणार आहे. नाशिक- पुणे लोहमार्गात जाणाऱ्या जमिनींचा नेमका किती मोबदला मिळणार याविषयीची चर्चा बाधित शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनने गेल्या गाव पातळीवरील खरेदी खताच्या सरासरीच्या तुलनेत मोठा मोबदला देण्याविषयी आपली सकारात्मकता दर्शवली आहे.
अशी असतील या मार्गावर स्थानके
या मार्गावर पुणे जिल्ह्यात १२, नगर जिल्ह्यात ६ आणि नाशिक जिल्ह्यात चास, दाेडी, सिन्नर, माेहदरी, शिंदे आणि नाशिकराेड अशी ६ स्थानके असतील. सध्या २०० किलाेमीटर प्रतितास असलेली गती २५० किलाेमीटर प्रतितास वाढवता येणार आहे. प्रत्येक ७५० मीटर अंतरावर, रेल्वे मार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला येण्या-जाण्याची सुविधा असेल.