सतर्क रहा ; गुंतवणुकीच्या नावाखाली केली महिलेची फसवणूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ फेब्रुवारी । गुंतवणुकीच्या नावाखाली चांगला परतावा देतो असे सांगून महिलेची 41 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी केतन रांभिया याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार गृहिणीच्या एका मैत्रिणीने केतनशी ओळख करून दिली होती. केतनचे गोरेगाव येथे दुकान आहे. केतनने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगितले. जर आपल्याकडे पैसे गुंतवले तर चांगला परतावा देऊ असे महिलेला सांगितले. त्यावर महिलेने विश्वास ठेवून 2019 ते 2020 या काळात टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवले. तीन वर्षांसाठी 16 टक्क्यांनी पैसे परत करू असे सांगितले गेले. त्या गुंतवलेल्या पैशाबाबत महिलेने केतनकडे मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने तो करार केलेला बॉण्डपेपर पाहिला. त्या बॉण्डपेपरवर एकसारखेच नंबर असल्याने महिलेला संशय आला. तिने अन्य महिलांकडे त्या बॉण्डपेपरबाबत विचारणा केली असता त्याच्या बॉण्डपेपरचा नंबरदेखील एकच होता. महिलेने याची माहिती तिच्या पतीला दिली. त्यानंतर महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून केतनला अटक केली. त्याने गुंतवणुकीचे पैसे कोणत्या बँकेत ठेवले आहेत, आतापर्यंत कितीजणांनी केतनकडे पैसे गुंतवले होते याचा तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *