महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि 19 फेब्रुवारी । गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. या कलगीतुऱ्याचा पुढचा अंक आज राज्यात बघायला मिळाला असून आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोनचे बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या आणि भाजपवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
हे जे कुणी किरीट सोमय्या आहेत, गेल्या चार दिवसांपासून त्यांचे रोज एक प्रकरण मी देत आहे. पालघरला वेवूर नावाच्या गावात त्यांचा एक फार मोठे प्रोजेक्ट सुरू आहे. त्याची किंमत २६० कोटी आहे. हा प्रकल्प त्यांच्या मुलाच्या नावावर सुरू आहे. त्या प्रकल्पावर त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या संचालक आहेत. या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत हे मी विचारले. ईडीच्या एका संचालकाची ही बेनामी मालमत्ता आहे. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
कुंडल्या काढण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. तुरुंगात बसून तुम्हाला तुमच्याच कुंडल्या बघाव्या लागणार आहेत. यांच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत. तुमच्या कुंडल्या नाही आहेत का आमच्याकडे? हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचे असेल केंद्रात सरकार, पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे आणि आमच्या हातात देखील बरच काही असल्यामुळे उगीच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात, असा टोला राऊतांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी बोलताना किरीट सोमय्यांना आव्हान दिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे नवे महात्मा जन्माला आले आहेत. त्यांना आम्ही आव्हान करतो. तुम्ही जो केंद्रीय मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार काढला आहे, ती लढाई पुढे घेऊन जा. आमच्याकडे देखील काही कागदपत्रे आहेत. ती आम्ही तुम्हाला देतो. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर तुम्ही ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसे या विषयावर तुम्ही शेपूट घालून बसला आहात, ती तुमची शेपूट आम्ही ओढून काढू, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
आता ही नौटंकी बंद करा. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा आता. माझे तर स्पष्ट आव्हान आहे. आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावा. तुम्हाला घाबरत आम्ही नाही. कितीही धमक्या तुम्ही दिल्या, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते है. बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल, अशा शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावले आहे. ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा पुढच्या आठवड्यात आम्ही बाहेर काढणार, असे देखील राऊत म्हणाले आहेत.