ड्रोन क्रांती : स्वातंत्र्योत्सव, दिवाळीची धूम; प्रजासत्ताकदिनी होणार 7500 ड्रोनचा शो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । यंदा प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीट समारंभात एक हजारांहून जास्त ड्रोनच्या शोनंतर भारत आगामी प्रजासत्ताकदिनी ७५०० ड्रोनचा शो करून विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे. या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर २५०० ड्रोनचा शो आणि दीपावलीत ५ हजार ड्रोनने आतषबाजी होईल. आतापर्यंत ५,५०० ड्रोनच्या शोचा विक्रम चीनच्या नावावर असून त्यांनी गेल्या डिसेेंबरमध्ये रशियाला मागे टाकून तो साधला. रशियाने गेल्या ऑक्टोबरमध्ये २५०० ड्रोन उडवून विक्रम रचला होता. ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचे एकतर्फी वर्चस्व आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने ड्रोन चालवण्यात (स्वार्म टेक्नॉलॉजी) चीननंतर अमेरिका आणि भारतात १००० ड्रोन एकाच वेळी नियंत्रित करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारत नव्या विक्रमाच्या माध्यमातून ड्रोन क्षेत्रात जगासमोर आपले अस्तित्व नोंदवण्याच्या मार्गावर आहे. देशात नव्या ड्रोन धोरणानंतर केवळ ड्रोन आयातीवर बंदी घालण्यात आली नाही तर ड्रोनसाठी अनुकूल वातावरणही तयार झाले आहे.

देशात २१२ ड्रोन स्टार्टअप असून ते संरक्षण, कृषी, देखरेख, सर्वेक्षण, छायाचित्रण, मोजणी, डिलिव्हरी आदी क्षेत्रांत काम करत आहेत. बीटिंग रिट्रीट समारंभात ड्रोन शो करणाऱ्या आयआयटी-दिल्ली समर्थित स्टार्टअप बोटलॅब डायनॅमिक्सच्या सहसंस्थापक डॉ. सरिता अहलावत म्हणाल्या, ७५०० ड्रोन उडवता यावेत यासाठी शोचे डिझाइन बदलत आहोत. आम्ही तीन टप्प्यांत ड्रोनची संख्या वाढवू. १० ते १३ मार्चदरम्यान गांधीनगरमध्ये संरक्षण प्रदर्शनात एक हजार ड्रोन बीटिंग रिट्रीट सोडून स्वतंत्र सादरीकरण होईल. आयआयटी दिल्लीच्या सोनिपत सॅटेलाइट कॅम्पसच्या ४० एकरांत प्रशिक्षण योजना आहे.

हरियाणाच्या मानेसरमध्ये शनिवारी १०० किसान ड्रोनसह एकाच वेळी कीटकनाशक आणि खतांचा शिडकावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रयोग आभासी माध्यमातून पाहिला. जे काम शेतकरी आधी ३ ते ४ तासांत करत होते ते ड्रोनने केवळ १० मिनिटांत केले. यामुळे पाणी, वेळ आणि स्राेतांची बचत झाली. किसान ड्रोन विकसित करणारे स्टार्टअप गरुण एअरोस्पेस दोन वर्षांत एक लाख ड्रोनची निर्मिती करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *