महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सोमय्या यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले होते. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या भाषेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. राऊतांनी म्हटलं की, राजकारणाची भाषा बदलली आहे, असं मुळीच वाटत नाही जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहेत. ‘तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा’ असं म्हणत राऊत म्हणाले की, अशा लोकांची काय पूजा करावी, का मिरवणूक काढावी. जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर ठुमकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे, असं राऊत म्हणाले.