मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत, मग जनतेला का वाइन पाजताहेत : रामदास आठवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः दारू घेत नाहीत, मग जनतेला वाइन पाजवण्यासाठी सहज का उपलब्ध करून देत आहेत, असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित करत आपल्या मिश्कील शैलीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात साेमवारी आयोजित केलेल्या सभेत ते बाेलत हाेते. या वेळी मंचावर बाबूराव कदम, पप्पू कागदे, मिलिंद शेळके, संजय ठोकळ, प्रवीण नितनवरे, शरद कीर्तिकर, अनिल चोरडिया, संतोष लाठे आदींची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना मानतात. तसेच सर्व समाज एकत्र यावा यासाठी प्रयत्न करतात म्हणून मी त्यांच्यासोबत जोडला गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण ‘मत खाण्यापेक्षा सत्ता मिळवण्याचे राजकारण केले’ असा त्यांनी अप्रत्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना टोला लगावला. पुढे त्यांनी हेही स्पष्ट केले की, भविष्यात जर सर्वच आंबेडकरी विचारांचे पक्ष एकत्र आल्यास त्याची धुरा स्वतः बाळासाहेबांनी हातात घ्यावी. या वेळी आठवले यांनी स्थानिक नागरिकांच्या निवेदनावर बोलताना तरुणांनी नाेकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करावा. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजनांच्या माध्यमातून कर्ज मिळते त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या सभेला सुखदेव सोनवणे, रमेश दाभाडे, जे.के. आमराव, किशोर साळवे, मनोज तरकसे, बी.जी. गायकवाड, शत्रुघ्न देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-पुरुषांची उपस्थिती होती. प्रवीण नितनवरे यांनी प्रास्ताविक केले. नामदेव सावंत, साहेबराव इंगोले यांनी सूत्रसंचालन केले.

आठवलेची शीघ्र कविता
‘आज माझा भरून आला आहे ऊर
कारण माझ्या पाठीशी उभं आहे वाळूज-पंढरपूर
मी तर आहे भीमाच्या तालमीत तयार झालेला शूर
म्हणून मी बदलून टाकणार आहे वाळूज-पंढरपूरचा नूर
तुम्ही सर्वांनी लावलात माझ्या खांद्याला खांदा
म्हणून मी करून टाकला आहे बऱ्याच लोकांचा वांदा…’
खास आपल्या शैलीत कविता सादर करून आठवलेंनी सभेला खळखळून हसवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *