महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । कमी किंमतीला विकत घेतलेल्या एखाद्या वस्तुची किंमत जर कोट्यवधींमध्ये निघाली, तर कसं वाटेल? नेमकी हीच भावना अमेरिकेत राहणाऱ्या माणसाच्या मनात आली आहे. अवघ्या 2200 रुपयांमध्ये खरेदी केलेल्या एका दुर्मिळ चित्राची किंमत 75 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जात आहे.
ही घटना अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स येथे राहणाऱ्या एका माणसासोबत घडली आहे. त्याने एका लिलावातून स्केचप्रमाणे दिसणारं एक चित्र खरेदी केलं. त्याची किंमत 2200 रुपये इतकी होती.
पण, जेव्हा त्याने या पेंटिंगचे फोटो टाकले, तेव्हा ते पेंटिंग साधंसुधं नसून अतिशय दुर्मीळ असं ‘The Virgin and Child with a Flower on a Grassy Bank’ नावाचं चित्र आहे. ते चित्र अल्ब्रेक्ट ड्यूरर नावाच्या चित्रकाराने इसवी सन 1503मध्ये काढलं होतं.
हे चित्र पंधराव्या शतकातील रेनेसान्स काळातलं एक अभिजात चित्र आहे. अतिशय मऊ कागदावर स्केचप्रमाणे रेखाटलेलं ते चित्र 2016साली या माणसाने खरेदी केलं होतं. आता ते चित्र लंडन आर्ट गॅलरी अग्न्युज ही संस्था विक्रीसाठी काढणार आहे. या चित्राची किंमत 75 कोटींहून अधिक आहे.