महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. (ED raided on Nawab Malik House)
नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१९९३ च्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याची शक्यता आहे.
जाणून घ्या घटनाक्रम
पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले .
त्यानंतर १ तास मलिक यांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केली
चौकशी केल्या नंतर ०७:३० वाजता नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय
नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात घेऊन गेले असल्याची माहिती आहे
सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिमागे लावण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही याआधी नवाब मलिक यांनी केला होता.
निवडणुकांच्या आधी शरद पवार यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. आता उत्तर प्रदेशातही हेच उद्योग सुरू आहेत, असा घणाघात नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने केला होता. केंद्र सरकारच्या सुडबुद्धीनं सुरु असलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, सरकार केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपसमोर झुकणार नाही, असे सांगत नवाब मलिक यांनी राज्यातील भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
माझ्या घरी लवकरच पाहुणे येणार
समीर वानखेडे प्रकरणात आरोप करताना मलिक यांनी महत्वाचं ट्वीट केलं होतं. माझ्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार, असं त्यांनी म्हटलं होते. मात्र पाहुण्यांचा योग्य प्रकारे पाहुणचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.