तीन दिवसांचे अष्टविनायक दर्शन हेलिकॉप्टरने अवघ्या पाच तासांत शक्य; 21 मार्चपासून प्रारंभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अष्टविनायकांचे दर्शन लवकरच हेलिकॉप्टरद्वारे अ‌वघ्या पाच तासांमध्ये शक्य होणार आहे. येत्या २१ मार्चपासून या सेवेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर सेवा ओझरहून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अष्टविनायक दर्शनासाठी सध्या दोन-तीन दिवस लागतात. सुमारे ८०० किलोमीटरचा हा प्रवास असतो. मात्र, अनेक भाविकांपाशी वेळेची कमतरता असते. अधिक मोबदला देण्याची त्यांची तयारी असते, हे लक्षात घेऊन हेलिकॉप्टर सेवेचा विचार आला, अशी माहिती ओझर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. हेलिकॉप्टर सेवा प्रकल्पासाठी कवडे यांनी पुढाकार घेतला आहे. अष्टविनायकाशी संबंधित सर्व ट्रस्टी, आस्थापना आणि यंत्रणा यांच्याशी विविध बैठका झाल्या असून सर्वांची संमती मिळाली आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी सर्वांची अंतिम बैठक होणार आहे, असेही कवडे यांनी सांगितले.

३१०० रुपयांमध्ये लक्झरी कोच सुविधा मिळणार
हेलिकॉप्टर सेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्य भाविकांसाठी अष्टविनायक ट्रस्टतर्फे विशेष लक्झरी कोचची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. लक्झरी कोचद्वारा दोन दिवसांत अष्टविनायक दर्शन शक्य होणार असून या सुविधेसाठी प्रति भाविक ३१०० रुपये आकारले जाणार आहेत. या शुल्कात निवास, भोजन समाविष्ट असेल. कोचमधून एकावेळी ५७ भाविक प्रवास करू शकतील. ही सेवाही २१ मार्चपासून सुरू होणार आहे.

सेवेची सुरुवात ओझरपासून

उद्योगपती अविनाश लांडगे यांच्याकडून हेलिकॉप्टर
प्रति भाविक एक लाखापर्यंत खर्च अपेक्षित
प्रत्येक अष्टविनायक स्थानी हेलिपॅडची सोय
पुणे जिल्ह्यात ६, रायगड जिल्ह्यात २ अष्टविनायक स्थाने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *