महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । कमॉडिटी बाजारात आज बुधवारी तेजीला ब्रेक बसला. मागील तीन सत्रात वधारलेल्या सोने आणि चांदीमध्ये आज नफेखोरांनी नफावसुली केली. आज बुधवारी सोने ३०० रुपयांनी तर चांदी ४५० रुपयांनी स्वस्त झाले.
एमसीएक्सवर आज बुधवारी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५००३२ रुपये इतका आहे. त्यात २९६ रुपयांची घसरण झाली. आजच्या सत्रात सोन्याचा भाव ४९९५१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.
आज चांदीला देखील नफेखोरीचा फटका बसला. चांदीच्या किमतीत आज जवळपास ५०० रुपयांची घसरण झाली. सध्या एक किलो चांदीचा भाव ६३९७७ रुपये इतका खाली आला आहे. त्यात ३६० रुपयांची घसरण झाली. आज इंट्रा डेमध्ये चांदीने ६३८१८ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६००० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ५०१८० रुपये इतका आहे. त्यात २८० रुपयांची घसरण झाली. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५०१८० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७३५० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१६६० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०१८० रुपये इतका आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव १९०० डॉलर प्रती औंस इतका वाढला होता. आज बुधवारी स्पॉट गोल्डचा भाव १८९८.६३ डॉलर प्रती औंस झाला. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १९१३.८९ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव २४ डॉलर प्रती औंस आहे. रशिया युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने भांडवली बाजारात अस्थिरता असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे.