हे महादेवाचे असे एक मंदिर जे फक्त महाशिवरात्रीलाच उघडले जाते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । जगभरात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे वर्षाचे बाराही महिने खुली असतात तर काही फक्त काही महिन्यांसाठी खुली केली जातात. परंतु, मध्यप्रदेशात महादेवाचे असे एक मंदिर आहे जे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच उघडले जाते. मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एक खूप जुने महादेवाचे मंदिर आहे. प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर रायसेनच्या प्राचीन किल्ला संकुलातील एका उंच टेकडीवर वसलेले आहे. येथील भगवान सोमेश्वर महादेवाचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे दार फक्त महाशिवरात्रीच्या वेळीच उघडले जातात. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंदिराचे कुलूप फक्त बारा तासांसाठी उघडले जातात. म्हणजेच या दिवशीही सूर्योदयाच्या वेळी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर ते सूर्यास्तानंतर बंद केले जातात.

असे असताना देखील अनेक भक्त वर्षभर या मंदिराला भेट देतात, परंतु यादरम्यान मंदिराच्या दाराला कुलूप लावलेले असते. यावेळी भक्त बाहेरूनच महादेवाची पूजा करतात आणि नवस मागून मंदिराच्या लोखंडी दरवाजाला कापड बांधतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्त हे कापड उघडण्यासाठीही येतात.

या मंदिरात बांधलेल्या शिवलिंगाबद्दलची एक अद्भूत गोष्ट म्हणजे या शिवलिंगावर सूर्याची किरणे पडली की ते सोन्यासारखे चमकते. श्रावण महिन्यात भाविकांना जलाभिषेकासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था केली जाते. यावेळी लोखंडी जाळी लावून शिवलिंगाचे दुरूनच दर्शन घेतले जाते आणि पाईपद्वारे शिवलिंगाला जल अर्पण केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *