युक्रेनपाठोपाठ पोलंडही बळकावायचा पुतिन यांचा डाव? बेलारूसमध्ये रशियन सैन्याची जमवाजमव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून त्यांच्या फौजा अवघ्या काही तासात युक्रेनवर ताबा मिळवू शकतात. रशियाचे सैनिक राजधानी कीव्हच्या जवळ येऊन पोहोचले असून त्यांना रोखण्यासाठी युक्रेन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या युद्धात एकाकी पडलेल्या युक्रेनचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत.

या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी रशिया इतक्यावरच थांबणार नाही अशी भीती बोलून दाखवली आहे. पोलंड आणि बेलारूस सीमेवर रशियाने बेलारूसच्या हद्दीत आपल्या सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या फोटोंमध्ये रशियाच्या या हालचाली टीपल्या गेल्या आहेत.

बेलारूसमधील ब्रेस्ट शहरात रशियाच्या सैनिकांची जमवाजमव सुरू असून हे शहर पोलंडच्या हद्दीपासून अवघ्या 17 किलोमीटर लांब आहे. रशियाने इथे आपले सैनिक, हत्यारबंद गाड्या आणि 50 विविध अवजड उपकरणे आणली आहेत. या ठिकाणापासून जवळच असलेल्या एका रेल्वेयार्डातही रशियाने काही लष्करी उपकरणे आणून ठेवली आहे.

एबीसी न्यूजने ब्लिंकन यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की पुतिन हे युक्रेनपलिकडेही जाण्याची शक्यता आहे का ? यावर ब्लिंकन यांनी ही शक्यता असल्याचं कबूल केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी सांगितलं की पोलंड, स्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया हे नाटोचे सदस्य देश असून त्यांच्याविरोधात रशियाने लष्करी कारवाया केल्यातर त्याच्याविरूद्ध 30 देश एकत्रित उभे ठाकलेले असतील.

नाटोच्या एका सदस्याविरूद्ध हल्ला हा सगळ्या सदस्यांविरूद्धचा हल्ला मानला जाईल आणि आम्ही नाटो सदस्य देशांचा एक इंच तुकडाही कोणाच्या हाती पडू देणार नाही असं ब्लिंकन म्हणाले आहेत. पुतीन हे युक्रेनमध्ये सत्तापालट घडवून आणणार असल्याचं ब्लिंकन यांनी ठामपणे म्हटलंय. मात्र युद्धात काहीही झालं तरी युक्रेनमधील लोकशाही आणि त्या देशाचं स्वातंत्र्य हे कायम राहील असा विश्वास ब्लिंकन यांना वाटतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *