गोव्यात आजपासून कार्निव्हल…खा-प्या-मजा मारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ फेब्रुवारी । देशात अन्यत्र कोठेही साजरा न होणार्‍या कार्निव्हल महोत्सवाला गोव्यात आजपासून (शनिवार, 26 फेब्रुवारी) रंगारंग प्रारंभ होतो आहे. त्यामुळे चार दिवस किंग मोमोची राजवट राहील. या काळात खा- प्या – मजा मारा असा या महोत्सवाचा संदेश असतो. हा संदेश देत किंग मोमो गोव्यातील पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा शहरातून मिरवणुकीने फिरेल. या मिरवणुका आनंददायी असतात. मिरवणुकीत आकर्षक सजावट केलेले चित्ररथही असतात. पोर्तुगीज राजवटीच्या शेवटच्या काही वर्षांत गोव्यातही कार्निव्हलचे प्रमाण कमी झाले होते, गोवा मुक्तीच्या काळात त्याचे पुनरुज्जीवन झाले.

कार्निव्हल हा गोव्यातील प्रसिद्ध सण. ख्रिस्ती समाजात 18 व्या शतकापासून लेंटच्या आधी मेजवानी, मद्यपान करून आनंद देणारा हा सण आहे. कार्निव्हलला ‘कार्नव्हल’, इंत्रुज असेही म्हटले जाते. गोव्यावर राज्य करणार्‍या पोर्तुगीजांनी स्थानिकांना कार्निव्हलची ओळख करून दिली होती. राज्याच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याने आयोजिल्या जाणार्‍या कार्निव्हल मिरवणुकीत मोठे रंगीबेरंगी चित्ररथ, नृत्याचा आनंद घेणारी तरूणाई सहभागी असते. मिरवणुका ठेका धरायला लावतात. ती मिरवणूक पाहायला देशी, परदेशी पर्यटक मोठया संख्येने येतात.

महोत्सवामध्ये ख्रिश्चनांसोबत हिंदू परंपरा, पाश्चात्य नृत्य प्रकार देखील पहायला मिळतात. कार्निव्हलची उत्पत्ती प्राचीन रोम आणि ग्रीसमध्ये झाली असे समजले जाते. यानंतर हे कार्निव्हल्स स्पॅनिश आणि पोर्तुगीज वसाहतींमध्ये सुरू झाले आणि हळूहळू त्यांना गायन, नृत्य आणि मद्यपानासाठी ओळखले जाऊ लागले. कार्निव्हलचे अध्यक्ष किंग मोमो करतात, जो सुरुवातीच्या दिवशी आपल्या प्रजेला मजा करण्याचे आदेश देतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *