रश्मी शुक्ला यांना ‘फोन टॅपिंग’ प्रकरण महागात पडणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । शहरातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर फोफावले असून, हे रॅकेट उघड करण्याचे भासवून तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही नेत्यांचे फोन टॅप केले. अमजद खान, निजामुद्दीन बाबू शेख, रघु चोरगे आणि हिना साळुंखे अशी या गुन्हेगारांची नावे असून, शहरात मोठ्या प्रमाणात त्यांचा अमली पदार्थांच्या व्यवसाय आहे. ही मंडळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांची विक्री करतात. तबरेज सुतार; तसेच अभिजित नायर हे दोघे कुप्रसिद्ध बापू नायर टोळीचे सदस्य असून, जमिनी बळकावणे, खंडणी, दरोडा; तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे संघटितपणे करतात, अशीही पुष्टीही शुक्ला यांनी जोडली.

फोन टॅपिंग करताना कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यांनी काही नेत्यांना कोडनेम दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोबाइल क्रमांक अमजद खान या नावाने, विद्यमान शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांचा मोबाइल क्रमांक निजामुद्दीन शेख, माजी आमदार आशिष देशमुख यांचा मोबाइल क्रमांक रघु चोरघे आणि हिना साळुंखे या नावाने, माजी खासदार संजय काकडे यांचा मोबाइल क्रमांक तबरेज सुतार आणि अभिजित नायर या नावांनी पुणे पोलिसांनी ‘टॅपिंग’ला लावले. हे नंबर ‘टॅपिंग’ला लावताना या कथित गुन्हेगारांचा सहभाग अत्यंत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात असल्याचा दावाही करण्यात आला होता. राज्यातील सत्तांतरानंतर ‘फोन टॅपिंग’च्या झालेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला.

‘फोन टॅपिंग’साठी वापरण्यात आलेल्या नावांचा संबंध पुण्यातील गुन्हेगारीशी असून, त्याचाच गैरफायदा घेऊन हा प्रकार करण्यात आल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे ‘फोन टॅपिंग’ जवळपास ६० दिवस सुरू होते. त्यामुळे ते नजरचुकीने झाले नसल्याचेही रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. ‘टॅपिंग’ करण्यासाठी वापरण्यात आलेली नावे कोणी सुचवली; तसेच टॅपिंग करण्यामध्ये ‘हात’ असलेल्यांचीही कसून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुक्ला यांच्यावर बेकायदा ‘फोन टॅपिंग’प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयातील शुक्ला यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आला. सरकारने अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *