महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । सध्या सर्व जगाचं लक्ष रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाकडे लागलं आहे. यूक्रेनपेक्षा कित्येक पटीनं जास्त लोकसंख्या आणि अत्याधुनिक हत्यारांनी संपन्न असलेल्या शक्तिशाली रशियानं यूक्रेनवर हल्ला सुरू ठेवला आहे. यूक्रेनच्या सीमेत घुसून रशिया सातत्याने हवाई हल्ले, मिसाइल हल्ला आणि टॅँकसोबत यूक्रेनमधील शहरं उद्ध्वस्त करत आहेत. गुरुवारी रशियानं जेव्हा हल्ल्याला सुरुवात केली तेव्हा यूक्रेनच्या लष्करी तळाला आणि एअरपोर्टला टार्गेट करण्यात आले. चर्नोबिल शहर ताब्यात घेतल्यानंतर रशियाचं सैन्य यूक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने पुढे सरसावली.
रशियाच्या या आक्रमक पावित्र्यामुळे अनेक सुरक्षा तज्ज्ञांनी काही तासांतच रशिया यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करेल. राष्ट्रपती जेलेंस्की देश सोडून पळून जातील. लवकरच रशिया यूक्रेनवर ताबा घेईल असं भाकीत वर्तवलं. मात्र युद्धाला ४ दिवस होत आले तरी रशियासमोर झुकण्यास यूक्रेन तयार नाही. त्यामुळे रशियाच्या स्वप्नाला कुठेतरी तडा जाताना पाहायला मिळत आहे. भलेही रशिया यूक्रेनसोबतचं युद्ध जिंकेल परंतु यूक्रेनच्या सर्व शहरात त्यांच्या सैनिकांनी समोरासमोर युद्ध केले आहे. रशियाच्या सैन्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचाही रिपोर्ट आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांनी ऐतिहासिक युद्धनीतीचे प्रयोग केले.
यूक्रेननं वापरला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा
रशिया मोठ्या प्रमाणात लष्करी सैन्य आणि हत्यारं घेऊन यूक्रेनमध्ये दाखल झाले. अनेक शहरात बॉम्बहल्ले केले. परंतु यूक्रेननं रशियाचा प्रतिकार करण्यासाठी गोरिला युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा वापरून सर्वांनाच हैराण केले. राजधानी कीवसह अनेक शहरात युद्धासाठी सैन्यासह सर्वसामान्य लोकांनाही हत्यारं दिली गेली. लोकांना युद्धाचं ट्रेनिंग दिले. ट्रेनिंगनंतर लोकं सैनिकांसोबत शहराच्या सीमेवर तैनात होते. तर दुसरीकडे हल्ल्याचे फोटो, व्हिडीओ पाहून जगभरात रशियाविरोधात टीका सुरू झाली. शत्रूला घाबरवणे, मानसिक खच्चीकरण करणे, आर्थिक दृष्ट्या हतबल करणे हीच रणनीती यूक्रेन रशियाविरोधात वापरत आहे.
रशियाच्या हल्ल्याविरोधात यूक्रेनमध्ये राष्ट्रभक्तीची लाट निर्माण झाली. यूक्रेनच्या राष्ट्रपतीकडून अनेक लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, मॉडेल्स, खेळाडू हत्यारासह रशियाच्या सैन्याशी लढण्यासाठी उतरले. जगात यूक्रेनच्या लोकांमधील असलेल्या देशभक्तीचं कौतुक झाले. मागील वर्षी अफगाणिस्तानात तालिबाननं हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी पळून गेले त्यानंतर राजधानी काबुलवर तालिबाननं कब्जा केला होता. मात्र यूक्रेनमध्ये राष्ट्रपतींपासून सर्वसामान्य लोकंही युद्धात उतरले आहेत. त्यामुळे रशियाच्या हल्ल्याचा जगातील अनेक शहरांमध्ये तसेच रशियातही पुतिनविरोधात निदर्शने केली जात आहेत.