महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । केस गळणे ही समस्या जगातल्या तमाम लोकांना कधी ना कधीतरी भेडसावतेच. दुर्लक्ष केल्यास केस गळती प्रमाणाबाहेर वाढते आणि टक्कल पडू लागतं.
स्त्रिया आणि पुरुष दोघंही या समस्येने हैराण असतात. पण, केसगळतीची कारणं दोघांमध्येही वेगवेगळी असतात. साधारणतः वयाच्या एका टप्प्यावर केस गळू लागतात. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केस लवकर गळायला लागतात. त्यात सध्याच्या आहाराचा समावेश आहे.
इंग्लंडचे प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट केविन मूर यांच्या म्हणण्यानुसार, खाण्यात खूप जास्त प्रमाणात घेतलेलं मीठ तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे केस लवकर गळू लागतात. मिठात असलेलं सोडियम केसांच्या मुळाशी जमा होतं ज्यामुळे केसांच्या मुळाशी रक्तप्रवाहाला अडथळे निर्माण होऊन मुळं कमकुवत होऊ लागतातं.
सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे केस कमकुवत होऊन त्यांची चमक निघून जाते. जे केस राहतात, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. अर्थात मिठाचं प्रमाण खूप कमी केल्यास थायरॉईड ग्रंथींवर त्याचा परिणाम होतो आणि त्याचाही केसांवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे आहारात मिठाचं योग्य प्रमाण असणं गरजेचं असतं.