महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । समृद्धी महामार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी येत्या खुला होण्यापूर्वीच सहापदरी सिमेंट मार्गाला जागोजागी तडे पडल्याचा धक्कादायक प्रकार पॅकेज क्रमांक दहामधील फतियाबाद ते सुराळा या भागात समोर आला आहे. रस्त्यांवरील सिमेंटच्या भूपृष्ठभागावर अनेक ठिकाणी पडलेल्या भेगांचे नकाशे बुजवून टाकण्यासाठी रस्ते बांधणीचे कंत्राट घेतलेल्या एल अँड टी कंपनीकडून त्यावर “सीलँड मटेरियलच्या डागडुजीचा मुलामा’ देण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्ग रहदारीकरिता येत्या एप्रिल मेदरम्यान महामार्गाचे लोकार्पण होण्यापूर्वीच या महत्त्वाकांक्षी सिमेंट रस्त्यावर तडे पडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे समृद्धी महामार्ग निर्मितीत गुणवत्तेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क मुंबईशी गतिमान करण्यासाठी ५५ हजार कोटींचे भूसंपादन व रस्ता उभारणीचा प्रकल्प मंजूर झाला. राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ७०१ किमी समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले होते. राज्य रस्ते विकास महामंडळाने जलदगतीने रस्ता बांधणीसाठी एकूण १६ पॅकेजचे टप्पे केले आहेत. वैजापूर, गंगापूर तालुक्यातील गावाचा फतियाबाद ते सुराळा या पॅकेज क्रंमाक दहामधे समावेश केलेला आहे. या ठिकाणी आधुनिक यंत्राद्वारे महामार्ग उभारणीचे काम जवळपास संपुष्टात आले आहे.
तडे धोकादायक नाहीत
समृद्धी महामार्गातील पॅकेज क्रमांक दहामधील वैजापूर, गंगापूर भागात रस्त्याला जागोजागी तडे गेले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांनी मान्य केले. मात्र या भेगांमुळे रस्त्याला कोणताही धोका नाही. त्याना सीन केस स्क्रॅच असे म्हणतात. कंत्राटदाराकडून सीलँड मटेरियल टाकून तडे बुजवण्याचे काम केले जात आहे. – सुरेश अभंग, कार्यकारी अभियंता, राज्य विकास महामंडळ
सरफेस क्रॅकचा प्रकार, बांधकामतज्ज्ञांचे म्हणणे
या संदर्भात बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर महिती दिली. सिमेंट रस्ते बांधणीत तडा जाण्याचे दोन प्रकार आहेत. सरफेस तडा आणि काँक्रीट फेल्युअर असे स्थापत्य अभियांत्रिकीत दोन प्रकार आहेत. अधिक खोलवर आरपार तडा गेल्यास रस्ते बांधणी दरम्यान पाण्याचा वापर कमी किंवा सिमेंटचे आयुर्मान संपल्यामुळे असे प्रकार घडतात.
रस्ता एकसंध नसल्याची शंका होतेय व्यक्त
वैजापूर ते हडसपिंपळगाव या दरम्यान बहुतांश ठिकाणी रस्ता एकसंध नसल्याचा दिसतो. या भागात चढ-उताराचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते. तसेच हा प्रकार प्रामुख्याने लक्षात येत असल्याचे वाहनधारकांना सांगितले. यावर कार्यकारी अभियंता अभंग यांनी अंडरपास तसेच पुलामुळे असे चढ दिसतात, असे स्पष्टीकरण दिले.
पॅकेज क्रमांक १० मधील ५७ किमी रस्त्याचे काम पूर्ण
फतियाबाद ते सुराळा या ५७ किलोमीटरमधील रस्ता, लहान मोठे १०६ पूल व अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. सहा पदरांची ही मार्गिका असून रस्त्यावरील वाहतूक मार्गाची रुंदी ४७.५० मीटर आहे. हडसपिंपळगाव येथे इंटरचेंज काम प्रगतिपथावर आहे.तसेच जांबरगाव येथे छोटा इंटरचेंज वैजापूरकरांना समृद्धी महामार्गावर चढ-उतारासाठी बांधण्यात आलेला आहे.
कंपनीकडून सीलँड मटेरियल वापरून मलमपट्टी सुरू
सिमेंटमध्ये चुन्याचे प्रमाण असते. वापरानंतर त्यामधील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे तडे जातात. त्याला हेअरकेस असे संबोधले जात असल्याचे सांगण्यात आले.