Russia Ukraine War: युक्रेनचा रशियासोबत चर्चेस नकार ; दुसऱ्या फेरीतील चर्चा फिस्कटली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । रशिया आणि युक्रेन दरम्यान आज ‘बेलारूस’मध्ये दुसऱ्या फेरीत चर्चा नियोजित करण्यात आली होती. परंतु, युक्रेननं रशियाशी चर्चेस नकार दिल्यानंतर ही चर्चा फिस्कटलीय. मिळालेल्या माहितीनुसार, बेलारूसमध्ये आज या दोन्ही देशांत चर्चा होणार होती. या चर्चेसाठी रशियाचं प्रतिनिधीमंडळही बेलारूसमध्ये दाखल झालं होतं.

‘आम्ही चर्चा करू इच्छीतो, आम्ही युद्ध संपवू इच्छितो, आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत, परंतु त्या देशात नाही जिथून आमच्या देशावर मिसाईल डागल्या जात आहेत’, असं म्हणत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलारूसला आपल्या निशाण्यावर घेतलं होतं. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी आणि आपलं लष्कर युक्रेन सीमेपर्यंत रशियानं बेलारूसचीच मदत घेतली होती.

बेलारूसऐवजी रशियानं वारसा (पोलंडची राजधानी), ब्रातिस्लावा (स्लोवाकियाची राजधानी), बुडापेस्ट (हंगेरीची राजधानी), इस्तांबूल (तुर्कस्तानची राजधानी किंवा बाकू (अझरबैझानची राजधानी) या शहरांचा पर्याय समोर मांडला होता. युक्रेननं चर्चेच्या स्थळाला पर्याय म्हणून समोर ठेवलेले सर्व देश ‘नाटो’चे सदस्य आहेत.

युक्रेनवरील गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश आज ३ मार्च रोजी दुसऱ्या फेरीत चर्चेसाठी आमने-सामने येणार होते. बेलारूसमध्ये या दोन्ही देशांत चर्चेची पहिली फेरी पार पडली होती. परंतु, ही चर्चा निष्फळ ठरली होती. अशा परिस्थितीत आज होणार्‍या चर्चेकडे अनेक देशांचं लागून होतं.

खारकीव्हवर भीषण हल्ला

दरम्यान, युक्रेनचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या खारकीव्हमध्ये रशियाकडून रात्रभर गोळीबार आणि शस्त्रास्त्रांचा वापर करून हल्ला करण्यात आला. या गोळीबारात दोन लहानग्यांसहीत आठ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. रशियाच्या हल्ल्यानंतर ओख्तरका आणि खारकीव्ह यांसहीत युक्रेनच्या अनेक शहरांना आणि भागांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.

खारकीव्हमधील रशियन हल्ल्यांनी किमान तीन शाळा आणि कॅथेड्रलला लक्ष्य केलं.ओख्तिरकामध्ये अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. रशियानं युक्रेनच्या खोर्सेन या शहराचाही ताबा मिळवला आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरानं गेल्या वर्षी नाटो-समर्थित युद्ध सरावाचं आयोजन केलं होतं.

झेलेन्स्की यांचं नागरिकांना हार न मानण्याचं आवाहन

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशात आपल्या देशातील नागरिकांना रशियाविरुद्धची हार न पत्करता लढाई सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय. राजधानी कीव्हवर रशियाचा आठव्या दिवशीही हल्ला सुरूच राहिला. बुधवारी उशिरा फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, ‘ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला याची जाणीव व्हायला हवी की त्यांना युक्रेनियन नागरिकांकडून तोडीस तोड प्रत्यूत्तर मिळेल. आम्ही अशा एका राष्ट्राशी संबंधीत आहोत ज्याने एका आठवड्यात शत्रूचे मनसुबे उद्ध्वस्त केलेत’ असं म्हणताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा देशाभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.

युक्रेनला पुन्हा उभं करणार : झेलेन्स्की

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की खचलेले, निराश झालेले नाहीत तर आपल्या राष्ट्रावर हल्ला करणाऱ्या शत्रुसमोर ते पाय रोवून आपल्या जमिनीवर उभे राहिलेत.

युद्धानंतर आम्ही युक्रेनला पुन्हा एकदा उभं करू, असा विश्वासही झेलेन्स्की यांनी गुरुवारी व्यक्त केलाय. सोबतच, तुम्ही आमच्या देशावर आणलेल्या या परिस्थितीची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी रशियाला दिलाय. खारकीव्हवर केलेल्या विध्वंसक हल्ल्यानंतर राजधानी कीव्हवर कब्जा करण्याचा रशियाचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *