‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा, आजारांना दूर ठेवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात सर्व प्रकारची खनिजे, जीवनसत्त्वे, फळे, भाज्या यांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे आजार, ताणतणाव यापासून संरक्षण होतेच शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहायला मदत होते. आपल्या आहारात रंगीबेरंगी फळे, भाज्या, धान्य यांचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात. बहुतेक लोक लाल, पांढरे, हिरवे इत्यादी रंगाचे पदार्थ खातात, मात्र गडद काळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करणे टाळतात किंवा काळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश आहारात कमी प्रमाणात केला जातो. काळे पदार्थ आरोग्यासाठी सूपरफूड आहेत, जे खाल्ल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर होतात. पाहूया काळ्या रंगाचे काही आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ. ज्या निरोगी राहण्याकरिता तुम्हाला मदत करतील. जाणून घेऊया काही काळ्या चविष्ट पदार्थांबद्दल.

काळे तांदूळ
काळ्या तांदळाचा समावेशही रोजच्या आहारात करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक पांढरे आणि ब्राउन तांदूळ खाता पण काळे तांदूळ खाणे टाळतात. काळ्या तांदळात एंथोसोयानिन हा घटक असतो. हा घटक इंफ्लेमेशनचे काम करतो. या तांदळामुळे शरीरात तयार होणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना आळा बसतो. या तांदळात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आरोग्यासाठी हे तांदूळ फायदेशीर आहेत तसेच मधुमेह, कर्करोग, यकृताच्या आजारापासून दूर राहायचे असेल तर काळा भात खावा. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. शिवाय काळा भात खाल्ल्यानेही दृष्टी सुधारायला मदत होते.

काळे द्राक्ष आणि बेरी ज
जर तुम्ही फक्त सफरचंद, केळी, संत्री खात असाल तर यापुढे फळांमध्ये काळी बेरी, काळी द्राक्षे यांचा समावेश करा. ही सर्व काळी फळे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. ब्लॅकबेरी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. जळजळ कमी होते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काळी द्राक्षे, काळी बेरीदेखील खाणे आवश्यक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. महिलांमधील मासिक पाळीच्या समस्या दूर करण्याचे गुणधर्म या फळांमध्ये आहेत.

काळे उडीद
हिरवी, पिवळी, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगाच्या डाळींचा आहारात समावेश केला जातो, यासोबत काळ्या रंगाच्या उडीद डाळीचाही अवश्य समावेश करणे आवश्यक आहे. काळी उडीद डाळ आहारात फारच कमी प्रमाणात खाल्ली जाते. काळ्या उडदामध्ये इतर डाळींप्रमाणेच प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. याशिवाय यामध्ये फायबर, लोह, पोटॅशियम या पौष्टिक घटकांचे प्रमाण जास्त असते.

काळे अंजीर
हाडे मजबूत होण्याकरिता काळे अंजीर खावे. यामध्ये फायबर, पोटॅशियम असते ज्यामुळे पचनशक्ती मजबूत व्हायला मदत होते. ज्यांची पचनक्रिया कमजोर आहे, त्यांनी काळ्या अंजीराचे सेवन अवश्य करावे. काळ्या अंजीरमध्ये खनिजे असतात, यामुळे साखरेची पातळी न वाढता नियंत्रणात राहाते. मधुमेही रुग्णही काळे अंजीर खाऊ शकतात. काळ्या अंजीरात असलेल्या पौष्टिक घटकांमुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशी वाढत नाही. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

काळा लसूण
काळ्या रंगाच्या भाज्या, फळे, धान्ये, बिया अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी असतात. काळ्या लसणात अॅलिसिन कंपाऊंड, अँटीऑक्सिडंट ही तत्त्वे असतात ज्यामुळे हृदय निरोगी राहायला मदत होते. काळे लसूण जळजळ कमी करते, स्मरणशक्ती वाढवते. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी काळ्या लसणाचा आहारात समावेश करावा. त्याचप्रमाणे काळ्या मशरूममध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम असते. ब्लॅक मशरूम, ब्लॅक लसूण, काळे तीळ, ब्लॅक क्विनोआ हे पदार्थदेखील रोजच्या डाएटमध्ये खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *