महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी मार्गावर प्रत्येक 30 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. नागरिकांना रविवारी (दि. 6) दुपारी तीननंतर मेट्रो प्रवासाचा आनंद घेता येणार आहे, तर सोमवार (दि.7) पासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत नियमितपणे मेट्रो प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
शहरातील दापोडी ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत अशी 7.5 किलोमीटर अंतराची मेट्रोची मार्गिका तयार आहे. त्यापैकी मोरवाडी, पिंपरी चौकातील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावणार आहे.
या मार्गावर महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी व फुगेवाडी असे पाच स्टेशन्स आहेत. फुगेवाडी ते दापोडी मार्गाचे तसेच, दापोडी स्टेशनचे काम अपूर्ण असल्याने दापोडीपर्यंत मेट्रो सुरू करण्यात येणार नाही.
तर, मोरवाडी चौक ते मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतचा मार्ग मेट्रो कोचच्या देखभाल व दुरूस्तीसाठी वापरला जाणार आहे.पालिका भवन ते फुगेवाडी मार्गावर रविवारी दुपारी तीनपासून नागरिकांना प्रवास करता येणार आहे.
दर अर्ध्या तासाने मेट्रो धावणार आहे. एका स्टेशनसाठी 10 रूपये व त्यापुढे जाण्यासाठी 20 रूपये तिकीट आहे. वीस रूपयांत नागरिकांना पिंपरी ते फुगेवाडीपर्यंत प्रवास करता येणार आहे.
लहान मुले, प्रौढ व ज्येष्ठ यांना एकाच किंमतीचे तिकीट असणार आहे. मेट्रोचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. मेट्रोची वाहतुक सोमवारपासून नियमितपणे सुरू होणार आहे.
सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत प्रत्येक 30 मिनिटाने मेट्रो धावणार असून, प्रवाशी संख्या वाढल्यानंतर फेर्यांत वाढ केली जाणार आहे.
संत तुकारामनगर, फुगेवाडी स्टेशनचे शंभर टक्के काम
संत तुकारामनगर व फुगेवाडी या दोन मेट्रो स्टेशनचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने चढण्यास व उतरण्यास लिफ्ट, सरकते जिने व पायर्या आहेत; मात्र, महापालिका भवन, नाशिक फाटा, कासारवाडी या स्टेशनवर अद्याप जिन्यांचे काम अपूर्ण आहे.
महापालिका भवन स्टेशनवर एकाच बाजूला लिफ्ट व सरकते जिने आहेत. इतर स्टेशनवर जिने तयार करण्याचे काम सुरू आहे. गरजेनुसार प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे महामेट्रोच्या अधिकार्यांनी सांगितले.
स्वारगेटपर्यंत काम पूर्ण झाल्यास प्रतिसाद वाढणार
फुगेवाडीच्या पुढे दापोडी, बापोडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट असे स्टेशन आहेत. त्या मार्गाने स्वारगेटपर्यंतचे काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढेल.
पिंपरीहून पुण्यात जाण्यास नागरिक मोठी पसंती देतील. पिंपरी ते स्वारगेट हा 17.4 किलोमीटर अंतराचा मार्ग पूर्ण होण्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.