महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; पुणे – संपूर्ण देश लॉकडाऊन असताना शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लॉकडाऊन काळात शुल्क वसुलीसाठी पालकांवर सक्ती करू नये असा आदेश सोमवारी काढला आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
‘कोरोना’मुळे १४ एप्रिल पर्यंत देशात संचारबंदी रहाणार आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक शाळा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क जमा करण्यासाठी तगादा लावत आहेत. शाळांकडून पालकांना वारंवार मेसेज पाठविले जात असल्याने शुल्क भरायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपसचिव राजेंद्र पवार यांनी शुल्क जमा करण्यासाठी सवलत दिली असून तसे परिपत्रक काढले आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात हालचालीवर बंधने घालण्यात आल्याने नागरिकांकडे पैशाची चणचण निर्माण झाली आहे. एसएससी, सीबीएससी यासह सर्व बोर्डाच्या संस्थांनी चालू व आगामी वर्षाचे शुल्क जमा करताना सहानूभूती दाखविणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये. संचारबंदी शिथिल झाल्यावर पालकांना शुल्क भरण्यासाठी सूचना करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या काळात शुल्क भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे