महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २०२१मध्ये वर्षभर सातत्याने अवकाळी व लांबलेल्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले. याच वातावरण बदलाचा परिणाम दोन वर्षांपासून जाणवत असून, २०२२मध्ये जानेवारीत अवकाळीने जोरधार पर्जन्यवृष्टी केली. त्यापाठोपाठ आता मार्चमध्ये पुन्हा अवकाळीचे ढग गडद झाले आहेत.
राज्यासह नाशिक जिल्ह्यात आज, सोमवारपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नाशिकला ‘यलो अॅलर्ट’ लागू केला आहे.
पश्चिम मध्य बंगाल उपसागर, मन्नारची खाडी आणि तमिळनाडू, पुद्दुचेरीसह दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सोमवारपासून वाऱ्याचा वेग वाढणार आहे. उत्तर किनारपट्टीलगत चक्रवात आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणीय बदलांचे ढग दाटले आहेत. त्यामुळे दहा मार्चपर्यंत उत्तर भारतासह महाराष्ट्रात गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. त्या दरम्यान, प्रतितास वीस किमीपेक्षा अधिक वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. यासह बदलत्या वातावरणामुळे पुन्हा साथीचे आजार तोंड वढ काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या असून, नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.