युक्रेनचे भविष्य धोक्यात! रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या वक्तव्याने चिंता वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । मारियापोल शहरातील शस्त्रसंधी निष्फळ ठरल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे भवितव्य संकटात असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशियावर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळेच युद्ध घोषित करावे लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

रशियन एअरलाइन ‘एरोफ्लोट’मधील हवाई सुंदरींशी संवाद साधताना पुतिन यांनी हा दावा केला. ही बैठकीचे प्रसारण टीव्हीवरून करण्यात आले. युक्रेन-रशिया संघर्ष वाढत असताना रशियाकडून कठोर टीकाही होत आहे. युक्रेनमधील विविध शहरांवर रशियन सैन्य हल्ले करीत आहे. दुसरीकडे युक्रेनने आपल्या लष्कराची संख्या चौदा लाखांपर्यंत वाढवली आहे. रशियन फौजांनी मारियुपोल शहरात बॉम्बहल्ले वाढवले आहेत. याशिवाय किव्हच्या उत्तरेकडील चेर्निहिव्ह शहरातील रहिवासी भागात रशियाने बॉम्बवर्षाव केला आहे, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुतिन यांनी युद्धाला युक्रेनचे नेतृत्व जबाबदार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ‘ते जे करीत आहेत, ते त्यांनी कायम ठेवले तर, युक्रेनच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. असे झाले, तर या परिणामांना पूर्णपणे तेच जबाबदार असतील,’ असे पुतिन यांनी म्हटले आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेला दणका देणाऱ्या पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांवरही त्यांनी टीका केली आहे. या निर्बंधांमुळेच युद्ध जाहीर करावे लागल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील चर्चेची तिसरी फेरी आज, सोमवारी होणार असल्याचे युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्याने सांगितले. यापूर्वीच्या बैठका बेलारूसमध्ये झाल्या असून, त्या निष्फळ ठरल्या आहेत.

बीजिंग : युक्रेनमध्ये आग भडकेल, अशा पद्धतीचे पाऊल उचलण्याला चीनचा विरोध असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याकडे स्पष्ट केले. ‘स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व ही मूल्ये कोण पाळते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे,’ असे ब्लिंकन यांनी सांगितले. या दोघांचे शनिवारी फोनवर संभाषण झाल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. ‘नाटो’च्या पूर्वेकडील विस्तारामुळे रशियाच्या सुरक्षेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामाकडे अमेरिका आणि युरोपने लक्ष दिले पाहिजे, असे वँग यांनी सुचवले. युद्धप्रश्नी मार्ग काढण्यासाठी; तसेच युरोपमधील सुरक्षा यंत्रणांबाबत मेळ साधण्यासाठी वँग यांनी संपर्क साधला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *