महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; मुंबई : रिझर्व्ह बँकेने कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या हप्त्यांवर तीन महिन्यांची सूट दिली आहे. आरबीआयच्या आदेशांनुसार पुढील तीन महिन्यांसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना ईएमआय भरण्यापासून सूट मिळणार आहे. मात्र, या बाबतीत कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी मिठाची गुळणी धरली आहे. अनेक मोठ्या बँकांनी या आदेशानुसार प्रत्यक्ष कोणत्याही सूचना जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळ ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
ईएमआयमध्ये सूट देण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतरही सोमवारपर्यंत कर्ज घेणाऱ्या अनेक ग्राहकांना मोबाईलवर बँकेकडून कर्जाच्या हप्त्यासाठी मेसेज आले आहेत. या मेसेजमध्ये निश्चित तारखेला अकाउंटमधून पैसे कापले जाणार असून त्यासाठी योग्य ती रक्कम आपल्या खात्यात उपलब्ध करून ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा घेत बँकेच्या धोरणांमध्ये बदल केले होते. त्यानुसारच कर्जाच्या हप्त्यांच्या बाबतीत तीन महिन्यांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही सूट सरकारी, खासगी, ग्रामीण, सहकारी किंवा हाउसिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी लागू करण्यात आली. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि अॅक्सिस बँक इत्यादींसारख्या मोठ्या बँकांनी याबाबत कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाहीत. बँकेच्या शाखांना मुख्य शाखेकडून तसे कोणतेही आदेश अथवा सूचना मिळालेल्या नाहीत.
बहुतांश बँकर्सच्या म्हणण्यानुसार, ईएमआय स्किपिंग हा पर्याय ग्राहकांना निवडायचा आहे. मात्र, जे ग्राहक ईएमआय भरू शकतात, त्यांना अन्य काही लाभ मिळणार नाही. तसेच अनेक बँक्स आपल्या ग्राहकांना या बदलांची माहिती मेसेज आणि मेलच्या स्वरूपात करून देणार आहेत. मात्र, ही तीन महिन्यांची सूट रकमेत मिळणार नसून ती काही काळ पुढे ढकलली जाणार आहे. मात्र, यामुळे कर्जाचे तीन हप्ते भरण्यासाठी अजून तीन महिने वाढणार असल्याने या तीन महिन्यांचं अतिरिक्त व्याजही त्यांना चुकवावं लागू शकतं, असं काही बँकिंग तज्ज्ञांचं म्हणणं आहे