महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वॉर्नच्या निधनावर संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि वॉर्न सोबत अनेक सामन्यात खेळलेला रिकी पॉन्टिंगला सर्वात मोठा धक्का बसला. वॉर्नला श्रद्धांजली देताना रिकी पॉन्टिंगला अश्रू अनावर झाले.
थायलंडमध्ये शुक्रवारी ४ मार्च रोजी शेन वॉर्नने निधन झाले. एका मुलाखतीत वॉर्नला श्रद्धांजली वाहताना पॉन्टिंग म्हणाला, जगभरातील अन्य लोकांप्रमाणेच शेनच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी झोपण्याआधी हा विचार केला होता की, मला मुलींना नेटबॉलच्या सरावासाठी घेऊन जायचे आहे. पण झोपेतून उठलो तेव्हा सर्व काही बदलले होते. या बातमीतून बाहेर पडण्यास मला अनेक तास लागले. वॉर्न माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता. मी त्याच्या इतक्या सर्वोत्तम गोलंदाजासोबत खेळलो नाही. तो सर्वकालिन महान खेळाडू होता. वॉर्नने फिरकी गोलंदाजीला बदलून टाकले आणि क्रांती घडवली.
रिकी पॉन्टिंगने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मला शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा त्याला सर्वप्रथम भेटलो होते तेव्हा मी फक्त १५ वर्षाचा होतो. तो मला पंटर नावाने हाक मारायचा. आम्ही एका दशकापेक्षा अधिक काळत संघात होतो. अनेक चढ उतार पाहिले. तो असा एक व्यक्ती होता ज्याच्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवू शकता. मला अभिमान वाटतो की आतापर्यंतच्या सर्वात महान गोलंदाजासोबत खेळलो.