महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । रशिया-युक्रेन युद्ध (Ukraine Russia War) गेल्या १२ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धात युक्रेनमधील महत्वाची शहरं उद्ध्वस्त झाली आहे. यापूर्वी नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी रशियानं युक्रेनमधील दोन शहरांमध्ये काही तासांसाठी युद्ध थांबवण्याची घोषणा केली होती. आज पुन्हा रशियानं तात्पुरता युद्धविराम (Russia Declares Ceasefire) घोषित केला आहे. याबाबत स्पुटनिकने माहिती दिली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या १२ दिवसांपूर्वी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे. रशियानं युक्रेनच्या रहिवासी भागांवर देखील बॉम्बहल्ले केले आहेत. तसेच युक्रेनच्या अणुभट्टीवर देखील ताबा मिळवला आहे. इतकंच नाहीतर युक्रेनियन लष्कराचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. युक्रेन हल्ल्याचा निषेध म्हणून पाश्चिमात्य देशांनी रशियावर बंदी घातली आहे. रशियाच्या विमानांना आणि त्यांच्या काही वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अनेक सोशल मीडिया वेबसाईट्सने देखील रशियामध्ये सेवा देण्याचं टाळलं आहे.
रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी देश सोडून इतर पाश्चिमात्य देशांकडे धाव घेतली. मात्र, बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जीवाची भीती आहे. त्यामुळे काहींनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी युक्रेन सोडले आहे. या लोकांना देशातून बाहेर पडता यावे, यासाठी दोन दिवसांपूर्वी रशियानं युद्धबंदीची घोषणा केली होती. पण, युद्ध फक्त काही तास थांबवले. त्यामुळे इतके नागरिक देश कसा सोडणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आज फ्रान्सच्या विनंतीनंतर रशियानं पुन्हा काही तासांसाठी युद्धबंदीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. किव्ही, खारकिव्ह, सुमी, मारियोपोल या शहरांमध्ये युद्धविराम घेण्यात आला आहे. आज दुपारी १२ पासून हा युद्धविराम सुरू होणार आहे.