महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ मार्च । अमेरिकेत क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. क्रिप्टो करन्सीला परवानगी देणाऱ्या प्राथमिक विधेयकावर याच आठवड्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अमेरिकेत क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक कायदेशीर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्या सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धाने पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यांनतर डाॅलरच्या तुलनेत रशियन चलन रुबलमध्ये प्रचंड घसरण झाली होती. निर्बंध आणि डाॅलरला शह देण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून क्रिप्टो करन्सीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी अमेरिकेनेदेखील पावले उचलली आहेत. अमेरिकेने क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता देण्याची तयारी सुरु केली आहे. याच आठवड्यात यावरील प्रस्तावाला मान्यता दिली जाऊ शकते असे सूत्रांनी म्हटलं आहे.
अमेरिकेत क्रिप्टो करन्सीचे धोरण ठरवताना सरकार, ट्रेझरी विभागाला नियमावली तयार करावी लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शक तत्वांचा समावेश असलेला कार्यकारी अध्यादेश राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मंजुर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान यामुळे अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हसाठ देखील स्वत:चे डिजिटल चलन आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जानेवारी महिन्यात फेडरल रिझर्व्हने क्रिप्टो करन्सीचे फायदे तोटे याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला होता. कायदेशीर मान्यता दिल्याने अमेरिकेतील क्रिप्टो करन्सी बाजाराला आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.