कलिंगड उत्पादकांसाठी मागील दोन वर्ष नुकसानीचे ; यंदा तरी अच्छे दिन येणार अशी आशा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ मार्च । यंदा खरिपासह फळबागांना आणि आता रब्बी हंगामातील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. पण कलिंगड उत्पादक शेतकरी हे गेल्या दोन वर्षापासून संकटात आहेत. ऐन (Watermelon) कलिंगड बाजारात दाखल होणार तेवढ्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा परस्थिती बदलत आहे. (Watermelon Rate) कलिंगडाचे दर तर वाढत आहे शिवाय बाजारपेठाही खुल्या असल्याने किमान यंदा तरी अच्छे दिन येणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कलिंगड हे हंगामी पीक आहे. (Seasonable Crop) लागवडीपासून केवळ अडीच महिन्यामध्ये ते विक्रीयोग्य होते. मात्र, दरम्यानच्या काळातील शेतकऱ्यांची मेहनत आणि व्यवस्थापनच शेतकऱ्यांच्या पत्त्यावर पडणार आहे. कालावधी कमी असला तरी योग्य काळजी घेतली तर यंदा कलिंगड उत्पादक शेतकरी हे मालामालच होणार आहेत.रमजान ईद, कडाक्याचे ऊन असे हंगाम साधून कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन हे खानदेशात घेतले जाते.

असे करा व्यवस्थापन
कलिंगड हे हंगामी पीक असले तरी लागवडीपूर्वी आणि पीक बहरात असताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर वजनात फरक पडून अधिकचा दर मिळणार आहे. कलिंगडाची दोन पध्दतीने उत्पादन घेता येते. एक बियाणे लावून तर दुसरे नर्सरीमधील रोपांची लागवड करुन. शेतकऱ्यांना कलिंगड लागवड करण्यापूर्वी शेतजमिनीची मशागत करणे गरजेचे आहे. लागवडीकरिता अधिकचा वेळ झाला असेल तर शेतकऱ्यांनी थेट नर्सरीमधून रोप आणून केलेली लागवड फायदेशीर होणार आहे. लागवडीपूर्वी योग्य वाणाची निवड करणे महत्वााचे आहे. यामध्ये काळ्या पातीचे, हिरव्या पातीचे असे वेगवेगळे वाण असून शेतजमिनीनुसार याची निवड करावी लागणार आहे. मल्चिंग टाकूनच लागवड करणे गरजेचे आहे. कारण यामुळे किड-रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही. शिवाय ठिबकचा वापर करुनच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

हंगामानुसार घेतले जाते उत्पादन
हे पीक हंगामी असून उत्पादन वाढीसाठीही शेतकरी योग्य हंगामाचीच निवड करतात. रमजान महिना हेरण्यासाठी लागवडीचे नियोजन केले जाते तर हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील वाढत्या मागणीचा विचार करुन लागवड केली जाते. डिसेंबरपासून वेगवेगळ्या टप्प्यावर कलिंगडची लागवड केली जात आहे. खानदेशात तर खरिपाचे क्षेत्र रिकामे झाले की कलिंगड लागवड केली जात असून सर्वाधिक लागवड ही याच भागात होते.

सध्या बाजारपेठेतले काय आहे चित्र
कलिंगडला सध्या जागेवर म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर 8 ते 11 रुपये किलो असा दर मिळत आहे. 10 रुपये हा सरासरी दर मानला जात आहे. उत्पादनावरील मेहनत, खर्च हे सर्व पकडून किमान 7 ते 8 रुपये जरी दर मिळाला तरी शेतकऱ्यांचा फायदा आहे. यंदाची स्थिती वाढती मागणी आणि भविष्यात जर उन्हाचा कडाका वाढला तर अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकरी भाऊ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *