महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ मार्च । पुणे मेट्रोचे उद्घाटन रविवारी (दि.6) झाले. पहिल्या व दुसर्या दिवशी मेट्रोतून प्रवास करण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सहकुंटुब तसेच, मित्रमंडळी मेट्रोतून ये-जा करीत मेट्रो सफरीचा आनंद लुटत आहे. दोन दिवसांत 13 हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला. त्या माध्यमातून महामेट्रोला एकूण 1 लाख 82 हजार 320 रुपयांचे उत्पन्न मिळाले. पिंपरी, फुगेवाडी व संत तुकारामनगर या स्टेशनवर बसण्यास नागरिक सर्वांधिक पसंती देत आहेत. पहिल्या दिवशी रविवारी दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत 9 हजार 438 नागरिकांचा प्रतिसाद लाभला. नागरिकांची संख्या मोठी असल्याने रात्री दहापर्यंत मेट्रो धावत होती.
नागरिक सहकुटुंब मेट्रो प्रवास करत होते. त्यात ज्येष्ठांपासून बालगोपाळांचा समावेश आहे. तसेच, तरुण मित्रमंडळी एकत्रित येऊन मेट्रोची राईट एन्जॉय करीत आहेत.प्रवासाची छायाचित्र व व्हिडिओ काढण्यात अनेक जण मग्न असल्याचे दुसर्या दिवशीही दिसले. सोमवारी सायंकाळी सातपर्यंत 3 हजार 90 नागरिकांनी प्रवास केला. प्रतिसाद लक्षात घेऊन रात्री दहापर्यंत मेट्रो धावत होती. या तीन तासांतपाचशेपेक्षा अधिक नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला.
स्टेशनची उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर
मेट्रो सुरू झाली असली तरी, स्टेशनचे कामे अद्याप अपूर्ण स्थितीत आहेत. ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मोरवाडी चौकातील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी स्टेशन येथील अनेक कामे अपूर्ण स्थितीत आहेत.
ती पूर्ण करण्यात कामगार व्यस्त असल्याचे चित्र आहे. पिंपरी, नाशिक फाटा, कासारवाडी येथील जिन्याचे काम अपूर्ण असल्याचे दिसत आहे. संत तुकारामनगर व फुगेवाडी येथे सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत.
प्रवास करताना ही घ्या दक्षता
प्रवास करताना तसेच, स्टेशनच्या बाहेर पडेपर्यंत तिकीट जपून ठेवा.
तिकीट नसल्यास स्टेशनच्या आत किंवा बाहेर प्रवेश दिला जात नाही.
प्लॅटफार्मवर पिवळ्या पट्टीच्या पुढे उभे राहू नका.
प्रवास करताना मोठी बँग, पिशवी व इतर अजवड साहित्य बाळगू नका.
पस्टेशन आल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडल्यानंतर लगेच बाहेर पडा.
विलंब झाल्यास दरवाजे आपोआप बंद होतात.
मास्कचा वापर करा.
धोकादायकरित्या छायाचित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्या पाल्यावर लक्ष ठेवा.
स्टेशनखाली पुरेशा प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने स्वत:चे वाहन नेण्याबाबत विचार करा.
सरकत्या जिन्यावरून ये-जा करण्याची भीती वाटत असल्यास लिफ्ट किंवा जिन्याचा वापर करा.
शहराचे सौंदर्य पाहायचे असल्यास सकाळी किंवा दुपारच्या वेळेत मेट्रो सफरीचा आनंद घ्या.
मेट्रोच्या नियमाचे पालन करा.