महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ मार्च । इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर भर दिला जात आहे. विशेषतः तरुणवर्ग कॉलेज व ऑफिसला जाण्यासाठी आता इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय निवडत आहे. इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना ती एका चार्जिंगमध्ये जास्तीतजास्त किती अंतर कापू शकते हे तपासले जाते. येत्या काळात तुमचा आकर्षक डिझाईन, जास्त बॅटरी क्षमता व वेगवान इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सिंगल चार्जिंगमध्ये जवळपास 200 किलोमीटर अंतर कापणारी ओबेन इलेक्ट्रिक कंपनीची ओबेन रोर ही बाईक हिंदुस्थानात येत्या 15 मार्च रोजी लाँच होणार आहे. ओबेन इलेक्ट्रिक ही बंगळुरू येथील स्टार्टअप ई-बाईक कंपनी आहे. ही बाईक संपूर्णतः हिंदुस्थानी बनावटीची असल्यामुळे या बाईकची किंमत खिशाला परवडणारी असेल असा कंपनीचा दावा आहे.
ही बाईक हिंदुस्थानी बाजारात लाँच झाल्यानंतर, या बाईकची किंमत साधारणतः 1 लाख ते 1.15 लाखांच्या दरम्यान असणार आहे. ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 200 किलोमीटर अंतर कापू शकते. 2 तासात बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते. तसेच या बाईकचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास एवढा असून हि बाईक 3 सेकंदात 40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. या बाईकची निर्मिती बंगळुरू येथे केली जाणार असल्याने, एका वर्षात 3 लाख बाईक विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात.