महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; मुंबई : करोना रोखण्यासाठी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ई-कॉमर्स कंपन्यांची यंत्रणा कार्यरत झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात व्यत्यय आल्यामुळे काही राज्यांमध्ये ई-कॉमर्स सेवांच्या डिलिव्हरींवर परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांनी सर्व सेवा खंडीत केली होती. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश दिले. या आदेशाअंतर्गत किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची डिलिव्हरी करण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी देण्यात आली.
फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिगबास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना सरकारने घरपोच सेवा देण्याकरिता स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या आश्वासनामुळे यातील बहुतेक कंपन्यांनी किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत.
ग्राहक एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखत ई-कॉमर्स सेवा देत आहे. फ्लिपकार्टसारख्या कंपन्या कर्मचारी, खासकरून डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह आणि ग्राहकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठा-साखळी बळकट करीत आहेत.